esakal | साईसंस्थान कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी उपोषणाचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

A warning of a hunger strike for the salaries of Sai Sansthan employees

दिवाळी पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. साईसंस्थानने सत्तावीसशे कर्मचाऱ्यांची चाळीस टक्के वेतनवाढ मागे घ्यावी, तसेच त्यांचे दोन महिन्यांचे थकीत वेतन द्यावे. याबाबत पाच दिवसांत निर्णय घेतला नाही.

साईसंस्थान कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी उपोषणाचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिर्डी (अहमदनगर) : दिवाळी पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. साईसंस्थानने सत्तावीसशे कर्मचाऱ्यांची चाळीस टक्के वेतनवाढ मागे घ्यावी, तसेच त्यांचे दोन महिन्यांचे थकीत वेतन द्यावे. याबाबत पाच दिवसांत निर्णय घेतला नाही, तर सहा नोव्हेंबरपासून भाजपतर्फे साईमंदिरासमोर बेमुदत उपोषण केले जाईल, असा इशारा भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी दिला आहे. 

भाजप पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले, तसेच कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांना या मागणीबाबतचे निवेदन देण्यात आले. अशोक पवार, ज्ञानेश्वर गोंदकर, सचिन शिंदे, किरण बोऱ्हाडे व योगेश गोंदकर उपस्थित होते. 

गोंदकर म्हणाले, ""अकरा महिन्यांच्या करारावर कंत्राटी पद्धतीने सेवेत सामावून घेतलेल्या 598 कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन थकले आहे, तर सत्तावीसशे कंत्राटी कामगारांचे दोन महिन्यांचे वेतन थकले आहे. विशेष म्हणजे त्यांत 180 कोरोनायोद्धे आहेत. जोखमीचे काम करूनही त्यांना दोन महिन्यांपासून वेतन नाही.

दिवाळी पंधरा दिवसांवर येऊन ठेपली तरी साईसंस्थान कुठलाही निर्णय घ्यायला तयार नाही. या कंत्राटी कर्मचाऱ्यांची चाळीस टक्के वेतनवाढ मागे घेण्यात आली. पूर्वलक्ष्यी प्रभावाने ती पुन्हा लागू करावी. या कर्मचाऱ्यांनी आजवर आंदोलने केली. साईसंस्थानच्या अधिकाऱ्यांना निवेदने दिली, तरीही त्यांच्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला नाइलाजाने याप्रश्नी आंदोलन हाती घेण्याची वेळ आली आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image