शिर्डीत साई मंदिराच्या तळघरात आले पाणी

सतीश वैजापूरकर
रविवार, 2 ऑगस्ट 2020

मंदिरात तळघरात बाबांच्या मौल्यवान वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. तेथेच पाणी आले आहे.

शिर्डी (अहमदगर)ः साईबाबांच्या समाधी मंदिरातील तळघरात पाण्याचा पाझर सुरू झाला आहे. या तळघरात बाबांच्या नित्यपुजेच्या मौल्यवान वस्तू ठेवलेल्या असतात. समाधीच्या उत्तर बाजुला हा पाझर सुरू आहे. या मंदिराच्या बांधकामाला शंभर वर्षे लोटली आहेत. 

साईसंस्थानचे यापूर्वीचे अध्यक्ष द.म.सुकथनकर यांच्या कार्यकाळात विशिष्ट प्रकारची पॉलीकेमिकल रसायने व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून या मंदिराचे मजबुतीकरण करण्यात आले. मात्र, तळघरात पाझर सुरू झाल्याने काळजी घ्यावी लागत आहे. 

यंदा शिर्डी शहरात अवघ्या दोन महिन्यांत तब्बल चारशे मिलीमीटर पाऊस झाला. यापूर्वी कमी वेळात एवढा पाऊस पडल्याची नोंद नाही. येथील पावसाची वार्षिक सरासरी साडे चारशे मिलीमीटर एवढी आहे. यावरून यंदाचा पावसाचा जोर लक्षात येतो. त्यामुळे सर्वत्र भूगर्भातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली.

बऱ्याच ठिकाणी विहिरी तुडुंब भरल्या, त्यातून हाताने पाणी घेता येईल, अशी स्थिती आहे. मंदिराच्या चोहोबाजूंनी वाढलेल्या पाण्याच्या पातळीचा दाब वाढला. त्यातून हा हलका पाझर सुरू झाला. पूर्वी मंदिराजवळ आड होता.

हेही वाचा - सीना धरण भरलंय...भंडारदरापूर्वी मारला नंबर

नूतनीकरण्याच्या वेळी तो बुजविण्यात आला. हा आड खोल करून अशा अडचणीच्या काळात त्यातून पाण्याचा उपसा सुरू ठेवला असता तर कदाचित ही पाझराची अडचण उदभवली नसती. असे जाणकारांचे मत आहे. 

यापूर्वी 1998-99 च्या सुमारास कमी कालावधीत अधिक पाऊस झाल्याने साईमंदिराच्या तळघराच्या भिंतीना ओलावा येऊन पाझर सुरू झाला होता.

यंदा तर अवघ्या दोन महिन्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली. अद्यापि निम्मा पावसाळा शिल्लक असल्याने चिंता वाढली आहे. साईसंस्थानला तज्ञांचा सल्ला घेऊन या पाझराच्या समस्येतून मार्ग काढावा लागणार आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water came in the basement of Sai temple in Shirdi