अमृत योजनेमुळे नगरकरांवर पाणीबाणीचे संकट

अमित आवारी
Monday, 11 January 2021

नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. मात्र, या कामासाठी संबंधित विभागाला सुमारे दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी लागणार आहे.

नगर ः केंद्र सरकारच्या अमृत पेयजल योजनेतील जलवाहिनी जोडणीच्या कामासाठी शहराचा पाणीपुरवठा 19 ते 30 जानेवारीदरम्यान विस्कळित होणार आहे. या काळात नगरकरांना दोन ते तीन दिवसांआड पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले आहे. 

अमृत पेयजल योजनेतून नगरकरांना सुरळीत 24 तास स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी काम सुरू आहे. जलवाहिनी जोडणीचे काम सुरू होणार आहे. याबाबत नियोजनासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारातून पाणीपुरवठा, जलसंधारण खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी महापौर वाकळे बोलत होते. 

नगरकरांची पाण्याची गरज लक्षात घेता, शहराला मुळा धरणापासून ते पंपिंग स्टेशनपर्यंत अधिक क्षमतेची एक हजार मिलिमीटर व्यासाची नवीन पाइपलाइन करणे गरजेचे आहे. त्यामुळे नगर शहराचा पिण्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास बऱ्याच अंशी मदत होणार आहे.

नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. मात्र, या कामासाठी संबंधित विभागाला सुमारे दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी लागणार आहे. त्यामुळे पुढील 15 दिवस, म्हणजेच 19 ते 30 जानेवारीपर्यंत शहराचा पाणीपुरवठा विस्कळित होणार आहे. नागरिकांनी त्या दृष्टीने सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले. 

केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत होणाऱ्या या कामाचा आढावा डॉ. विखे पाटील घेत आहेत. नगर शहरासाठी ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण आहे. योजनेच्या अंमलबजावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बहुचर्चित उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात झाल्यानंतर केंद्र सरकारच्या या योजनेत खासदार डॉ. विखे पाटील यांनी लक्ष घातले आहे. 

बैठकीला महापालिका स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, नगरसेवक रवींद्र बारस्कर, निखील वारे, सतीश शिंदे, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, पाणीपुरवठा विभागप्रमुख रोहिदास सातपुते, शहर अभियंता सुरेश इथापे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सतीश बडे, रोहिदास थोरात, शोनन इंजिनिअरिंगचे राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water crisis on Ahmednagar residents due to Amrut Yojana