या धरणाचे पाणी गेले खपाटीला... "कुकडी'कडे शेतकऱ्यांचे डोळे 

नीलेश दिवटे 
सोमवार, 1 जून 2020

कर्जत व आष्टी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले सीना धरण उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पूर्णपणे आटले आहे. शेतकऱ्यांची उभी पिके जळू लागली आहेत. त्यामुळे कुकडीच्या आवर्तनातून सीना धरणात पाणी सोडावे, अशी मागणी होऊ लागली आहे. 

कर्जत : तालुक्‍यातील मिरजगाव, माहिजळगावसह परिसरातील शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीना धरणातील पाणीपातळी खालावली आहे. तसेच, "कुकडी'च्या आगामी आवर्तनातून सीना धरणात पाणी सोडण्यात येणार किंवा नाही, याबाबत निश्‍चित घोषणा न झाल्याने पिण्याच्या पाण्यासह उर्वरित उन्हाळी हंगामाचे काय होणार, असे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या धरणात मृत साठा शिल्लक असल्याने आवर्तनाची शक्‍यता मावळली आहे, तसेच धरणावरून कार्यान्वित असलेल्या पाणीपुरवठा योजनाही संकटात आल्या आहेत. त्यामुळे पिकांसह जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. यामुळे "कुकडी'च्या आगामी आवर्तनातून सीना धरणात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी होत आहे. 

हेही वाचा 72 वर्षापूर्वीची 73 वर्षात पुनरावृत्ती 

धरणाची साठवण क्षमता 2400 दशलक्ष घनफूट असून, कर्जत तालुक्‍यातील सात हजार 673 हेक्‍टर आणि आष्टी तालुक्‍यातील 673 हेक्‍टर, असे एकूण आठ हजार 346 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येत आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांत, अपवाद सोडल्यास सीना धरण पूर्ण क्षमतेने भरलेच नाही. आजअखेर धरणात मृत साठा शिल्लक आहे. येथून मिरजगाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. सध्या सीना धरण लाभक्षेत्रातील कर्जत व आष्टी तालुक्‍यांतील अनेक गावांत पाणीटंचाई भासू लागली आहे. सीना धरणातून पाणीपुरवठा योजना व शेतीसाठी पाणीउपसा करणाऱ्या शेतीपंपांची संख्या मोठी असल्याने, रोज तीन दशलक्ष घनफूट पाणीउपसा होत आहे. गेल्या वर्षी याच धरणातून रोज कर्जत व आष्टी तालुक्‍यांतील 355 टॅंकर भरले जात होते. 

हे आवश्‍य वाचा राशीनमध्ये एकाच कुटुंबातील पाच जण बाधित 

तालुक्‍यात समाधानकारक पाऊस होत नाही. सध्या सीना धरण लाभक्षेत्रातील विहिरी व कूपनलिका आटल्या आहेत. त्यामुळे पुढील संकट टाळण्यासाठी सीना धरणात "कुकडी'च्या आवर्तनातून एका आवर्तनासाठी पाणी सोडण्यात यावे. 
- पोपट खोसे, शेतकरी, मलठण 
--- 
सीना धरणाची सद्यःस्थिती 
धरणाची क्षमता- 2400 दशलक्ष घनफूट 
पाणीपातळी- 578.29 दशलक्ष घनफूट 
एकूण पाणीसाठा-679.87 दशलक्ष घनफूट 

मृतसाठा- 552.67 दशलक्ष घनफूट 
उपयुक्त पाणीसाठा-122.02 दशलक्ष घनफूट 
धरणातील गाळ-175.00 दशलक्ष घनफूट 

......  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The water level of Sina Dam dropped