साई संस्थान रूग्णालय गेले पाण्यात, ओढे बुजवल्याचा परिणाम

सतीश वैजापूरकर
Sunday, 13 September 2020

साईसंस्थानने विकसित केलेल्या लेंडी बागेत कमळाचे छोटे तळे वगळता, फुले औषधालाही सापडत नाहीत. लेंडी नाला सपाट करण्याची संधी मिळाली त्यांनी नाला विकला. साईसंस्थानने लेंडी बागेचे रूप बदलून टाकले. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला. 

शिर्डी ः साईबाबा समाधीमुळे येथे सुबत्ता नांदू लागली. जमिनीला सोन्याचे मोल आले. ओढे-नाले बुजवून त्यांवर टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. साईचरित्रात उल्लेख असलेला लेंडी नाला असाच काळाच्या उदरात गडप झाला.

पावसाच्या पाण्याची वाट अडली. त्यामुळे आज साईसंस्थानच्या रुग्णालयाच्या तळमजल्याजवळ पावसाचे पाणी शिरले. विमानतळाकडे जाणारा रस्ता फोडून आणि वीजपंप लावून दिवसभर पाणीउपसा सुरू होता. 
यंदा सातत्याने होणाऱ्या पावसाने जमिनीची पाणी जिरण्याची क्षमता संपली. आता जमिनीतून बाहेर निघणारे पाणी नैसर्गिक उताराच्या दिशेने वेगाने वाहते. त्यास इमारती व सपाट केलेल्या जमिनीचे अडथळे येतात. त्यामुळे हे पाणी शेतांत साठते.

रहिवाशांच्या घरांत शिरून मोठ्या नुकसानीस कारणीभूत ठरते. चूक एकाची आणि शिक्षा दुसऱ्याला, असे चित्र आहे. ओढे-नाले बुजविल्याने यंदा फार मोठे नुकसान सहन करण्याची वेळ येथील रहिवाशांवर आली. 
काळाच्या ओघात साईसंस्थानने लेंडी बागेचे रूप बदलले. बाबांच्या काळातली विहीर जपून ठेवली, हे भाग्यच. बाबांनी लेंडी बागेत फुलबाग फुलविली.

साईसंस्थानने विकसित केलेल्या लेंडी बागेत कमळाचे छोटे तळे वगळता, फुले औषधालाही सापडत नाहीत. लेंडी नाला सपाट करण्याची संधी मिळाली त्यांनी नाला विकला. साईसंस्थानने लेंडी बागेचे रूप बदलून टाकले. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला. 

साईसंस्थानचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी सुभाष जगताप म्हणाले, की नांदुर्खी, कनकुरी व पानमळ्याच्या बाजूने चार-पाच नाले लेंडी नाल्याला मिळत. त्यातून पावसाचे पाणी वाहून थेट गोदावरीला जात असे. काळाच्या ओघात लेंडी नाला लुप्त झाला. पावसाचे पाणी वाहायला जागा नाही. 

लेंडी नाल्याबाबत कोणी विचारत नाही 
साईचरित्र हा ग्रंथ साईसंस्थान प्रमाण मानते. देश-विदेशातील भाविक त्याची मोठ्या श्रद्धेने पारायणे करतात. मात्र, साईचरित्रात उल्लेख असलेला लेंडी नाला कुठे आहे असा प्रश्न कुणी विचारला, तर त्याचे उत्तर कोणापाशीही नाही. बाबांच्या काळातील लेंडी बागेचे स्वरूप बदलले. पावसाचे पाणी कुठेही शिरते. साईसंस्थानच्या रुग्णालयात आज पाणी शिरले. नैसर्गिक प्रवाह बदलल्याने शेतकऱ्यांचे विनाकारण नुकसान होते. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water seeped into Sai Sansthan Hospital