मुळा धरण गेले गाळात, पाण्याचा शेतीऐवजी होतोय दुसऱ्याच कारणासाठी वापर

Water wastage in radish dam
Water wastage in radish dam

राहुरी : मुळा धरणातील पाण्याचा अकृषक कामासाठी वाढलेला वापर. त्यात दिवसेंदिवस होणारी वाढ लक्षात घेता, भविष्यात सिंचनासाठी योग्य प्रमाणात पाणी मिळेल, याविषयी शंका आहे. त्यासाठी धरणातील गाळ काढून दोन टीएमसी क्षमता पुनर्स्थापित करणे, पश्‍चिमेला समुद्राकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्याचा शासनाचा निर्णय आहे, त्याची लवकर अंमलबजावणी करून, साडेचार टीएमसी पाणी धरणात आणणे, हेच उपाय आहेत. त्यादृष्टीने आताच पावले उचलावी लागतील, असे मत माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी व्यक्त केले. 

"सकाळ'शी बोलताना तनपुरे म्हणाले, ""मुळा धरणात 1972पासून पाणी साठविण्यास सुरवात झाली. त्यावेळी फक्त सिंचनासाठी पाणीवापर होता. पिण्याच्या पाणीयोजना व औद्योगिक पाण्याचे आरक्षण वाढत गेले. बाष्पीभवनासह अकृषक पाणीआरक्षण 5.8 टीएमसी झाले. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील 48 वर्षांत धरणात माती, वाळू, दगड असा गाळ साचत आहे. 2009मध्ये "मेरी'च्या (महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) पाहणी अहवालात, धरणात 41 दशलक्ष घनमीटर (दीड टीएमसी) गाळ असल्याचे म्हटले आहे. त्याआधारे सध्या धरणात दोन टीएमसी गाळ झाला असू शकतो.'' 

धरण्याचा पाणीवापराचा प्राधान्यक्रम बदलला. एकेकाळी अग्रक्रम असलेल्या सिंचनाला आता शेवटचा प्राधान्यक्रम आहे. अकृषक पाणीवापर वाढल्याने, सिंचनासाठी धरणातून 50 टक्के पाणी मिळते. सिंचनाचे पाणी पुनर्स्थापित करण्यासाठी शासनाला आताच पावले उचलावी लागतील, असे सांगून तनपुरे म्हणाले, ""धरणातील गाळ काढून, दोन टीएमसी पाणी वाढल्यास, लाभक्षेत्रातील 11 हजार हेक्‍टरचे पाणी पुनर्स्थापित होईल. गाळ काढण्याची प्रक्रिया 10 ते 15 वर्षे चालेल.

यादरम्यान आणखी अर्धा टीएमसी गाळ जमा होईल. म्हणजे, प्रत्यक्षात अडीच टीएमसी गाळ काढावा लागेल. त्यातून शासनाला महसूल मिळेल. शेतकऱ्यांना फायदा होईल. त्यासाठी शासनाने निविदाप्रक्रिया राबवावी, अशी मागणी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.'' 

ते म्हणाले, ""समन्यायी पाणीवाटपाची टांगती तलवार धरणावर आहे. जायकवाडीचा साठा 65 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असल्यास, धरणातून अडिच टीएमसीपर्यंत पाणी सोडावे लागते. त्यामुळे सिंचनाच्या पाण्यास फटका बसतो. सध्या कशीतरी अडिच आवर्तने होतात. जायकवाडीला पाणी गेले, तर एक किंवा दीड आवर्तने होतात. सिंचनाच्या पाण्याची तूट भरण्यासाठी पश्‍चिमेला समुद्राकडे वाहून जाणारे साडेचार टीएमसी पाणी पूर्वेकडे वळविण्याचा शासननिर्णय झाला आहे. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे.'' 


मुळा धरणाची स्थिती (दशलक्ष घनफूटात) 
क्षमता - 26,000 
साठलेला गाळ - 2,000 
अचल साठा- 4,500 
बाष्पीभवन 2,700 
अकृषक (पिण्याचे व औद्योगिक) आरक्षण - 3,100 
सिंचनासाठी उपलब्ध पाणी - 13,700 
एकूण सिंचन क्षेत्र (हेक्‍टर) - 82,920 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com