दहा महिन्याने भरला पहिल्यांदाच कोल्हारमध्ये आठवडे बाजार

सुहास वैद्य
Saturday, 19 December 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात सलग दहा महिन्यांपासून बंद ठेवण्यात आलेला कोल्हार भगवतीपूरचा आठवडे भाजीबाजार नव्या जोमाने भरला.

कोल्हार (अहमदनगर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात सलग दहा महिन्यांपासून बंद ठेवण्यात आलेला कोल्हार भगवतीपूरचा आठवडे भाजीबाजार नव्या जोमाने भरला. त्यामुळे गावाच्या बाजारपेठेवर रौनक दिसून आली. 

बाजारात आलेले ग्राहक खरेदीसाठी छोट्यामोठ्या दुकानदाराकडे वळाले. बाजार यापुढेही पूर्वीप्रमाणेच सुरू असणार असल्यामुळे स्थानिक उद्योग व्यवसाय पूर्वपदावर येण्याच्या व्यापार्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कोरोनाचे संकट दूर होत असल्याने गावात उत्सहाचे वातावरण निर्माण होत चालले आहे. कोल्हारमध्ये पहिला कोरोनाबाधित रुग्ण जूनमध्ये आढळल्यानंतर आरोग्यविभाग ग्रामपंचायत, पोलिस प्रशासन व विविध सेवाभावी संस्थांनी कोरोनाप्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यात बहुतांश यश आले आहे. 

सध्या गावात अपवादानेच कोरोनाचा रुग्ण आढळत आहे एकूणच कोरोना फैलावण्याची गावकऱ्यांमध्ये भीती दूर होत चालली आहे, असे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय घोलप यांचे मत आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोनामुक्तीकडे प्रभावी वाटचाल सुरु झाल्यामुळे ग्रामपंचायतीनी आठवडे भाजी बाजार सुरु करण्यासाठी जाहीर परवानगी दिली आहे. येथील आठवडे बाजार परिसरातील चाळीसगावांच्या 

प्रमुख बाजार सुरु असून कोल्हार भगवतीपूरही प्रवरा परिसरातील अग्रगण्य बाजारपेठ आहे. विशेष बाब म्हणजे, कोरोनाचे सावट दिवाळीच्या मुख्य सणवार हटले. आणि तेव्हापासून गावातील व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले. गावकरी व व्यापाऱ्यांनी शासनाच्या सर्व आवश्यक निर्देशांकाचे पालन केल्याचा तो एक सकारात्मक परिणाम आहे. दुकानदारांकडे येणाऱ्या ग्राहकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. 

गावातील गर्दीच्या ठिकाणी पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे. त्यांनी मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची धडक मोहीम सुरु केली आहे.तरीही खबरदारी म्हणून दुकानदारांनी व ग्राहकांनी तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधणे, आपापसात सुरक्षित अंतर राखणे, सॅनीटायझरचा वापर करणे अनिवार्य असल्याचे माजी सरपंच अॅड. सुरेंद्र खर्डे यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रभाव ओसरत चालल्यामुळे सध्याची परिस्थिती गावासाठी दिलासादायक आहे. आठवडे बाजार पुंन्हा सुरु झालेला असला तरी कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून व्यापारी, मंडईतील भाजीविक्रेते व ग्राहकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.
- अजित कुंकूलोळ, माजी अध्यक्ष व्यापारी संघटना, कोल्हार भगवतीपूर 

संपादन : अशोक मुरुममकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weekly market in Kolhar for the first time in ten months