esakal | शासनाच्या नियमांना नागरिकांकडून तिलांजली; ग्रामपंचायतने आठवडा बाजाराबाबत वेळीच लक्ष देण्याची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

Weekly market started in Kukane village

कोरोनामुळे मागील सहा महिन्यांपासून विस्कळीत झालेला आठवडे बाजार कुकाणे (ता. नेवासे) येथील बाजार तळावरील मूळ जागेवर भरला.

शासनाच्या नियमांना नागरिकांकडून तिलांजली; ग्रामपंचायतने आठवडा बाजाराबाबत वेळीच लक्ष देण्याची गरज

sakal_logo
By
सुनील गर्जे

कुकाणे (अहमदनगर) : कोरोनामुळे मागील सहा महिन्यांपासून विस्कळीत झालेला आठवडे बाजार कुकाणे (ता. नेवासे) येथील बाजार तळावरील मूळ जागेवर भरला. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन पाळण्यात येत असलेल्या नियमांना यावेळी नागरिकांनी तिलांजली दिल्याचे पहायला मिळाले.

वाढत्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेल्या मार्च पासून सर्वत्रच आठवडे बाजार भरविण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे कुकाणे येथे शेवगाव-नेवासे मुख्य रस्त्याचे कडेला केवळ भाजीपाला विक्रेते बसत होते. कुकाणे ही तालुक्यातील बत्तीस गावाची मुख्य बाजारपेठ समजली जाते. येथील आठवडे बाजार तालुक्यात सर्वात मोठा बाजार समजला जातो. येथे नेवासे, शेवगाव, पाथर्डी आदी तालुक्यातून ग्राहकांसह व्यापारी आठवडी बाजारात खरेदी- विक्रीसाठी येतात.

दरम्यान लॉक डाऊन नंतर पहिलाच आठवडे बाजारात असल्याने व्यापाऱ्यांची गर्दी बऱ्या प्रमाणात होती मात्र नागरिकांचा प्रतिसाद कमीच होता. यावेळी नागरिकांनी सुरक्षित अंतरासह मास्कचा वापर करण्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नसून,वेळीच याकडे ग्रामपंचायतने लक्ष द्यावे, अशी मागणी जाणकारांमधून होत आहे.कोरोनापूर्वी येथील आठवडी बाजारात जनावरांचा बाजार भरत होता. सध्या शहरातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. असे असले तरी आज येथील जनावरांचा बाजार भरलाच नाही.

भाजीपाल्याची तेजीत विक्री
गुरुवारी भरलेल्या आठवडी बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झालेली होती. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात कमालीची वाढ झालेली दिसून आली. यावेळी फुलकोबी 70, रुपये किलो, टोमॅटो 45 रुपये, भेंडी- 40 रुपये, दोडका 40 रुपये, कारले 60 रुपये, पत्ता कोबी 45 रुपये, मिरची 60 रुपये, कांदा 40 ते 80 रुपये बटाटा 50 रुपये तर मेथी 30, शेपू- 40 पालक भाजी 30- 40- रुपये किलोने विकली गेली.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image