Video : टोमॅटोतील व्हायरसचे काय आहे सत्य? शेतकरी काय म्हणतात..

What is the truth about the virus in tomatoes?
What is the truth about the virus in tomatoes?
Updated on

नगर ः टोमॅटो उत्पादकांना वेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशिष्ट प्रकारच्या रोगामुळे अख्खे फडच्या फड उदध्वस्त झाले आहेत. त्यामुळे एकरी सात ते आठ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. एकट्या अकोले तालुक्यात एक हजार एकरावर टोमॅटो बागा आहेत. त्यांना कोट्यवधी रूपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यातच टोमॅटो खाल्ल्याने कोरोना होत असल्याचे वृत्त व्हायरल झाल्याने जो चांगला माल होता तोही पडून आहे.

टोमॅटो फडांचे नुकसान विषाणूमुळे झाले आहे. यापूर्वी हा विषाणू कधीही बागेवर येत नव्हता, असे काही शेतकरी सांगतात. तर काही शेतकरी सांगतात, हा विषाणू नोव्हेंबर-डिसेंबरमध्येही होता. परंतु त्याचे प्रमाण कमी होते. बाधित टोमॅटो फडांचे नमुने बेंगलुरू येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा रिपोर्ट अद्यापि यायचा बाकी आहे. त्यामुळे हे टोमॅटो खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो, याची शहानिशा झालेली नाही. परंतु कृषी खात्याचे अधिकारी सांगतात, हे टोमॅटो खाल्ल्याने कोणताही परिणाम होत नाही. परंतु अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी हे टोमॅटो काढून फेकून दिले आहेत.

तिरंगा आणि लूज पडणे

अकोले तालुक्यातील तांभोळचे विलास काशिनाथ भांगरे सांगतात, माझ्या शेतामध्ये सिजेंटा कंपनीचे '१०५७' आणि सेमिनिस कंपनीचे 'आयुष्यमान' या दोन हायब्रीड वाणांची लागवड माझ्या शेतामध्ये केली होती.

यावर्षी दरवर्षीप्रमाणेच टोमॅटोचे प्लॉट अतिशय सुंदर व निरोगी आले. परंतु टोमॅटो सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये फळावर वेगवेगळे डाग, तिरंगा, लूज पडणे या समस्या जाणवायला लागल्या. त्यानंतर मी कंपनी प्रतिनिधीशी संपर्क केला कंपनी प्रतिनिधींनी टोमॅटोचे सॅम्पल बंगलोर येथील संशोधन लॅबमध्ये पाठवले. परंतु त्याचे रिपोर्ट मात्र आम्हाला दिले नाही. त्यांनी आम्हाला कंपनी गोपनीयतेचे कारण सांगितले.

तपासणी केली परंतु रिपोर्ट नाही

आम्ही तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क केला त्यांचेकडे सामूहिक व वैयक्तिक निवेदने दिली. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आमच्या तक्रारीची दखल घेऊन लॉक डाऊन असतानाही विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांची टीम आमच्या शेतामध्ये पाहणीसाठी आली. परंतु त्यांचेही रिपोर्ट आले नाही. त्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांशी पुन्हा संपर्क केला तेव्हा असे समजले पुन्हा एकदा टोमॅटोचे आणि बियाण्याचे सॅम्पल बंगलोरला पाठवले आहे. त्याचा रिपोर्ट आल्यानंतरच तुम्हाला रिपोर्ट मिळतील.

वास्तविक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील नामवंत कृषी विद्यापीठ आहे. आणि तेथे टोमॅटोच्या वाणांना परवानगी देताना ट्रायल घेतल्या जातात. सदर विद्यापीठात मोठमोठे शास्त्रज्ञ असताना. त्यांनी पाहणी केल्यानंतर ही शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नसतील तर मात्र शेतकऱ्यांनी कोणाकडे न्याय मागायचा हा प्रश्न निर्माण होतो.

बियाण्यामुळे समस्या

टोमॅटोच्या या आजाराच्या बाबतीत अनेक तज्ञ व्यक्तींनी अनेक मते मांडली परंतु आम्ही वर्षानुवर्षे टोमॅटो पिकवणारे शेतकरी असल्याने आमच्या अनुभवातून असे लक्षात येते की टोमॅटोवर आलेली सदर समस्या ही सदोष बियाण्यांमुळेच निर्माण झाली आहे. कारण टोमॅटोचे वाण निर्माण करणाऱ्या कंपन्या टोमॅटोच्या उत्पादन वाढीसाठी बियाण्यामध्ये जनुकीय बदल करतात. हे जनुकीय बदल केल्यामुळे सदर बियाणे पाच सहा वर्षानंतर आपली रोगप्रतिकारक्षमता गमावून बसते. त्यानंतर टोमॅटोच्या वाणांना अशा प्रकारच्या समस्या दिसायला सुरुवात होते. याचा अनुभव मागील काही वर्षांपासून आम्ही घेतलेला आहे. सिजेंटा कंपनीचे अनेक वाण त्यामध्ये अविनाश 2, अमृतम, 687,अभिनव, हे ठराविक कालावधीनंतर नामशेष झाले. कारण त्यांची रोगप्रतिकार क्षमता कमी झाली होती.

जनुकीय बदलाचा परिणाम

सध्या बाजारपेठेमध्ये असलेले टोमॅटोचे वेगवेगळे वाण हे किमान पाच ते सहा वर्षापासून बाजारपेठेत आहे. त्यामुळे या सर्वच वाणांतील जनुकीय बदलांमुळे रोगप्रतिकार क्षमता संपून समस्या निर्माण झाल्या आहेत. खरेतर या कंपन्या जनुकीय बदल करून जर बाजारपेठेत हे बियाणे आणत असतील तर विद्यापीठांनी दरवर्षी त्यांच्या ट्रायल घेतल्या पाहिजे. परंतु भारतातील सर्व विद्यापीठे एकदा ट्रायल घेऊन बियाणे बाजारपेठेमध्ये आणण्यास परवानगी देतात. त्यामुळे पुढील काही वर्ष या बियाणे विक्रेत्या कंपन्यांना कोणाच्याही परवानगीची गरज नसते.त्यामुळे बियाणे सदोष असल्यामुळे नुकसान मात्र शेतकऱ्यांचे होते. नुकसानीनंतर कृषी विभागाशी संबंधित यंत्रणा जाग्या होतात. 

एक एकर टोमॅटो पिकविण्यासाठी जवळपास दोन लाख रुपये खर्च येतो आणि त्यातून पाच ते सहा लाखापर्यंत उत्पन्न मिळते. माझे यावर्षी साडेसात एकर क्षेत्रावर टोमॅटो होते त्यासाठी जवळपास १५ लाख रुपये खर्च झाला. मला या पिकातून टोमॅटो मधून ३५ ते ४० लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते. कारण मागील वर्षी ४९ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com