असा नेमा ग्रामपंचायतीवर प्रशासक; भाजपचे राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना निवेदन

नीलेश दिवटे
Saturday, 18 July 2020

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमताना गावातील सर्वसामान्य जनतेचा विचार घ्यावा व यासाठी सामाजिक संघटना व पत्रकारांनी सर्व्हे करावा.

कर्जत (अहमदनगर) : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमताना गावातील सर्वसामान्य जनतेचा विचार घ्यावा व यासाठी सामाजिक संघटना व पत्रकारांनी सर्व्हे करावा, त्याआधारे बहुमताने नाव पुढे येणाऱ्या व्यक्तीची निवड प्रशासक म्हणून करावी, अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे यांनी केली आहे.
राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर योग्य व्यक्ती प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचे शासनाच्या ग्रामविकास विभागाने 13 जुलैला आदेश काढला असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. ही निवड पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी करतील असे आदेशात म्हटले असून हा आदेश पूर्णत: राजकीय हेतूने प्रेरित आहे, असे स्पष्ट दिसते आहे. कोरोना संकटाच्या काळात अशा पद्धतीने आदर्श लोकशाहीच्या कंठाशी नख लावण्याचा प्रकार आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांना प्रशासक म्हणून नियुक्त करता येणार नाही, असे या आदेशात म्हटले असून हे अत्यंत चुकीचे आहे. भाजपाचे तालुकाअध्यक्ष डॉ. सुनील गावडे यांनी विद्यमान सरपंच किंवा सदस्य यातील बहुमताने निवडून येईल त्या व्यक्तीसच प्रशासक म्हणून स्वीकारावे अशी मागणी केली आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
याशिवाय प्रशासक नियुक्त करावयाच्या गावात सामाजिक संस्था, तालुक्यातील पत्रकार यांनी पारदर्शक सर्व्ह करून यातून येणारे नाव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना कळवावे यातुन गावातील जनतेच्या भावनांचा आदर होईल व राजकीय हस्तक्षेप ही होणार नाही. कर्जत तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर भाजपा तालुकाध्यक्ष म्हणून माझ्या बारडगाव सुद्रीक या गावाचा सर्व्हे  पत्रकार, सामाजिक संस्था यांनी करावा, असे आवाहन त्यांनी निवेदनाद्वारे केली. हा प्रयोग यशस्वी झाला तर तो पूर्ण राज्यात वापरावा, असे आवाहन या निवेदनाद्वारे राज्यपाल, राज्याचे मुख्यमंत्री, ग्राम विकास मंत्री यांना तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे यांनी केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When appointing an administrator for a grampanchayat conduct a survey by journalists and social organizations