Success Story ः ८० म्हशी, ही कॉलेजकुमारी सांभाळते कशी? गुंठाही जमीन नाही!

The farmer's daughter takes care of 80 buffaloes
The farmer's daughter takes care of 80 buffaloes

निघोज : घरात मुलगा असला की वडिलांच्या जीवाला घोर नसतो. कारण तो बापाच्या हातातील कामं स्वतःच्या खांद्यावर घेऊन जबाबदारीचं ओझं हलकं करतो. याच समजातून मुलगाच झाला पाहिजे हा हट्ट धरला जातो. परंतु हल्लीच्या जमान्यात अमूक काम पुरूषाचं, तमूक काम महिलांचं असं काहीही राहिलेलं नाही. 

पारनेर तालुक्यातील निघोजच्या श्रद्धा ढवणकडं पाहिलं की छातीठोकपणे तसं सांगता येईल. काय करते बरं ही श्रद्धा? ऐकून नवल वाटेल अन अभिमानाने तुमचाही ऊर भरून येईल.

खेड्यातल्या मुली सर्वसाधारणपणे घरकामात आईला मदत करतात. फारच झालं तर शेतीत खुरपणी टुरपणीची कामं करतात. पण ही श्रद्धा त्याही पलिकडे जाऊन काम करते.

घरात तिच्यासह तीन भावंडं. तीच थोरली. वडील अपंग असल्याने तिच्यावर अर्थातच भार पडलेला. वडिलांकडे आहेत तब्बल ८०  म्हशी. त्याचं व्यवस्थापन तिच्याच हातात आहे. सकाळी उठून चारा आणायचा, दूध काढायचं, डेअरीला घालायचं, अशी कामं तीच करते. मोटारसायकलवरून दूध तर घालतेच पण चारचाकी वाहनही हाकत जनावरांना बाजारातून चारा आणते.

आता एवढं करते म्हणाल्यावर ती नक्कीच शिकलेली नसेल, असा तुमचा गैरसमज व्हायचा. पण तसं नाही. ती भावंडांना शिकवते आणि स्वतःही शिकते. सध्या ती सायन्स फॅकल्टीतून ग्रॅज्युअट झालीय. पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंय. आणि भविष्यात तिला आयएएस अधिकारीही व्हायचंय.

शेतकऱ्यांची कॉलेजमध्ये शिकणारी मुलं हल्ली शेणामातीत हात घालीत नाही. परंतु श्रद्धा ही कामं नेटाने करते. मुलिकादेवी महाविद्यालयातून तिने टीवायबीएस्सी पूर्ण केलंय. 

श्रद्धाचे वडील दिव्यांग, लहान बहीण अश्विनी पुण्यात शिक्षण घेते. लहान भाऊ कार्तिक दहावीत शिकत आहे. त्यामुळे कुटुंबाचा सगळा भार श्रद्धा आणि तिच्या आईवर आहे. वडिलांनी तिला लहानपणी कुस्तीचे प्रशिक्षण दिलं. पुढे जाऊन ती ज्युदोपटू बनली. दहावीत असतानाच ती दूध काढायला शिकली.

घरी असलेल्या चार म्हशींचा सुरुवातीला श्रद्धाने व्यवस्थापन केलं. हळूहळू तब्बल ऐंशी म्हशींपर्यंत पोहचली आहे. या म्हशींसाठी तिने वडिलांच्या मदतीने घराजवळच म्हशींसाठी दोन मजली गोठा बांधलाय. मजुरांच्या मदतीने ती दुग्धव्यवसाय करते. विशेष म्हणजे सर्व चारा विकत घेऊन तिने हा प्रयोग यशस्वी केलाय. थोडीफार जमीन आहे, परंतु ती खंडाने दिलीय.

पहाटे लवकर उठून स्वतःचं आवरणे आणि त्यानंतर मग गोठा, म्हशी धुणे, दूध काढणे, दूध काढल्यावर स्वतः ते दूध डेअरीवर घालणे ही कामे श्रद्धा करते. इतकेच नाही तर म्हशींसाठी पेंड किंवा म्हशीचे खाद्य घेऊन येणे आणि म्हशीला खाऊ घालणे ही सर्व कामे करून संध्याकाळी अभ्यास करणे असा श्रद्धाचा दिनक्रम आहे.ती कॉलेजात इतकी अप टू डेट असते, तिला कोणी म्हणणार की ही मुलगी एवढी कष्टाची कामं करते. घरातील बहुतांशी पैशाचे व्यवहार तिच्याचकडे असतात.

स्वतःचे शिक्षण करून घराला हातभार लावत असल्याने आईलाही श्रद्धाचा अभिमान आहे. गावातील लोकही तिचं कौतुक करतात.  वडीलही म्हणतात ही माझी मुलगी नाही तर मुलगाच आहे.

सुट्टीत आल्यावर तिची भावंडंही श्रद्धाला मदत करतात. कोणताही न्यूनगंड न बाळगता ती काम करते आहे, असं दिसल्यावर नावं ठेवणाऱ्या मैत्रिणीही तिचं कौतुक करतात. शिक्षकांनाही तिचा अभिमान आहे. श्रद्धाला ट्रेकिंगचीही आवड आहे. कामातून वेळ काढून ती छोटे-छोटे ट्रेकही करते.

शेतकरी असल्याचा मला आभिमान
आज अनेक युवक-युवती वेगवेगळ्या क्षेत्रात करीयरच्या वाटा शोधत असताना मला दुग्ध व्यवसायात उतरावे लागले. शेतीपूरक व्यवसायातून मला वडीलांच्या संसाराला हातभार लावता आला. सुरूवातीला मुली कॉलेजला जात असताना मी मात्र वाहनातून दूध घेऊन जायची. त्यावेळी थोडं अवघड वाटायचं पण आता सवय झाली आहे. हलकं-भारी असं कोणतंच काम नसतं. शेतकऱ्यांच्या पोरांनी शेती करायची नाही तर मग कोणी?

श्रद्धा सतीश ढवण, टीवायबीएस्सी, निघोज , पारनेर.

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com