नगरचे नेहरू मार्केट बांधायला नेमकं आडवंं येतंय कोण?

अमित आवारी
Monday, 11 January 2021

12 जून 2017च्या शासन निर्णयानुसार ही निविदाप्रक्रियाच रद्द करण्यात आली. नंतर आजतागायत नेहरू मार्केट पुन्हा कसे उभारणार

नगर ः शहरत एकेकाळी अरुणोदय होताना, सनई-चौघड्यांचे स्वर ऐकू येत. या आवाजाने नगरकरांची सकाळ मंगलमय होत असे. हा आवाज ज्या जवाहरलाल नेहरू मार्केटमधून यायचा, ते मार्केट जमीनदोस्त होऊन आता 10 वर्षे झाली, तरीही महापालिकेला तेथील नियोजित व्यापारी संकुलाचे भूमिपूजनही करता आलेले नाही.

तत्कालीन नगराध्यक्ष नवनीतभाई बार्शीकर यांनी नगरपालिका असतानाच्या काळात बांधलेली वास्तू पुन्हा बांधण्याची धमक नंतर कोणालाच दाखविला आली नाही.

हेही वाचा - गुगल मॅपने केला घात, रस्त्याऐवजी नेले धरणात

शहरातील गंजबाजारात इंग्रजांनी भाजीमार्केटसाठी एक शेड बनविले होते. या भाजीमार्केटच्या विकासासाठी तत्कालीन नगराध्यक्ष बार्शीकर यांनी 1975मध्ये योजना आखली. मात्र, त्यास काही व्यापाऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे चितळे रस्त्यावर महापालिकेच्या जागेत बार्शीकर यांनी नवीन भाजीमार्केट बांधण्याचा निर्णय घेतला. त्याला सुंदर मनोरा होता. त्यावर मोठे घड्याळ होते.

सकाळी सहा वाजता या मनोऱ्यातून सनई-चौघड्यांचे सुर ऐकू येत. या मार्केटमध्ये 40-50 भाजीविक्रेते बसण्याची सोय होती. 
शहरात महापालिका झाल्यावर ही वास्तू जीर्ण झाल्याचे कारण देत, 2010मध्ये ही इमारत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केली.

तत्पूर्वी 2001पासूनच इमारतीच्या खासगीकरणाचे वारे वाहत होते. 2016पर्यंत 9 वेळा खासगीकरणासाठी निविदाप्रक्रिया राबविली. 10व्या वेळेला तीन निविदा आल्या. त्यात ए. सी. कोठारी यांची निविदा 2 कोटी 41 लाख रुपयांची निविदा होती. मात्र, निविदेचे प्रीमियम व्हॅल्युएशन योग्य नसल्याचे कारण देत, काही राजकीय पक्षांनी विरोध केला.

12 जून 2017च्या शासन निर्णयानुसार ही निविदाप्रक्रियाच रद्द करण्यात आली. नंतर आजतागायत नेहरू मार्केट पुन्हा कसे उभारणार, याबाबत महापालिकेने धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही. शहरातील चांगल्या वास्तू पाडून महापालिका तेथे रिकामे भूखंड करीत असल्याचा आरोप होत आहेत. 

 राजकीय पक्षांची कार्यालये 
चितळे रस्त्यावर हे नेहरू मार्केट आहे. मार्केटच्या जागेला खेटून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर कार्यालय आहे. चितळे रस्त्यावरच शिवसेनेचे कार्यालय आहे. या मार्केटजवळील गांधी मैदानालगत भाजपचे कार्यालय आहे. मात्र, या पैकी कोणत्याही पक्षाला सत्ता असतानाही नेहरू मार्केट बांधता आलेले नाही. 

 
नगर शहरातील लोकप्रतिनिधी व सत्ताधाऱ्यांची शहरविकासाची मानसिकता नाही. बार्शीकर यांनी उभारलेल्या वास्तू जमीनदोस्त करण्याचे काम महापालिका अधिकारी व सत्ताधारी करीत आहेत. नेहरू मार्केटच्या जागेवर महापालिकेनेच वास्तू बांधल्यास उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल. 
- गिरीश बापट, ज्येष्ठ नागरिक 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who is behind the construction of Nehru Market in Ahmednagar?