esakal | बिहारला मोफत कोरोना लस, मग महाराष्ट्राचे काय? भाजपकडून राजकारण
sakal

बोलून बातमी शोधा

Why Maharashtra does not have free corona vaccine for Bihar

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता आल्यास मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देऊन भाजपाने कोरोना लसीचेही राजकारण केले आहे.

बिहारला मोफत कोरोना लस, मग महाराष्ट्राचे काय? भाजपकडून राजकारण

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता आल्यास मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देऊन भाजपाने कोरोना लसीचेही राजकारण केले आहे. सर्व राज्यांना मोफत लस देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असताना निवडणुका आहेत. म्हणून फक्त बिहारला मोफत लस देणार, मग महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून त्यांना कोरोनावरील लस देणार नाही का? केंद्र सरकार गोरगरिबांकडून कोरोना लसीचे पैसे घेणार आहे का? असे प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विचारले आहेत.

प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कोरोना महामारीने जनता त्रस्त असून अद्याप कोरोनाची लस उपलब्ध झालेली नाही त्यातच मतासाठी मोफत लसीचे गाजर दाखवणे हे भाजपाने ताळतंत्र सोडल्याचा प्रकार आहे. प्रत्येक भारतीयाला कोरोनाची लस मोफत मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, तो त्यांना मिळालाच पाहिजे. मंगळवारी राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सर्व भारतीयांना लस देण्यासाठी सरकारची तयारी आहे, असे सांगितले असताना, बिहारच्या लोकांनाच मोफत लस देऊ असे आश्वासन जाहिरनाम्यात देण्याचा भाजपाचा हेतू काय आहे.

कोरोना लसीसाठी भारतीयांचा पैसा खर्च होणार आहे मग लस फक्त बिहारसाठीच का. इतर राज्यात लस देणार नाही का? की त्यासाठी लोकांना पैसे मोजावे लागतील. हा केवळ जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्षनेते व बिहार भाजपाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी, मोदीजींचे बिहारवर जास्त प्रेम आहे, असे म्हटले होते. मग महाराष्ट्रावर मोदींचे प्रेम नाही का? जर प्रेम कमी असेल किंवा प्रेमच नसेल तर महाराष्ट्राला मोफत कोरोना लस देणार नाही का? असे प्रश्नही थोरात यांनी उपस्थित केले आहेत. 

निवडणुका आल्या की वारेमाप घोषणा करण्याचा रोग भाजपाला जडला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत बिहारला सव्वा लाख कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली होती. त्या पॅकजचे काय झाले. याचा बिहारच्या जनतेला मागील पाच वर्षात अनुभव आला. त्यांची फसवणूक झाली आहे हे समजण्याइतपत बिहारची जनता सुज्ञ आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्यावेळी इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्याचे काय झाले ते आज पाहतच आहोत. ही सगळी जुमलेबाजी असून त्यात भाजपाचा हातखंडा असल्याचेही थोरात म्हणाले आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर