पोपटराव पवारांनी का मागितले ग्रामपंचायतींना पॅकेज

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

हिवरेबाजार ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न एक लाख 25 हजार रुपये असून, सर्व खर्च गृहीत धरल्यास दिवाबत्ती व वीज बिलही भरू शकत नाही,

नगर ः राज्यातील बहुतांशी ग्रामपंचायती कमी उत्पन्नाच्या आहेत. त्या ग्रामपंचायतींना पॅकेज द्यावे, अशी मागणी राज्याच्या आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनातून केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे, की राज्यातील बहुतांशी ग्रामपंचायती कमी उत्पन्नाच्या आहेत. तरी कोरोनाच्या कालखंडात शासन निर्णयानुसार अपंग, विधवा व वंचित कुटुंबांसाठी किराणा व धान्याची मदत करण्यासाठी शासनस्तरावरून आदेश देण्यात आलेले आहेत. त्यांना साहित्य पुरविणे, गावात औषधफवारणी करणे, सॅनिटायझर व नॅपकिन पुरविणे आदी सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्री ठाकरे यांची नगरमध्ये गुंतवणूक

हिवरेबाजार ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न एक लाख 25 हजार रुपये असून, सर्व खर्च गृहीत धरल्यास दिवाबत्ती व वीज बिलही भरू शकत नाही, अशी स्थिती काही ग्रामपंचायतींची आहे. त्यामुळे कोरोनाच्या कालखंडात कमी उत्पन्नाच्या ग्रामपंचायतींना हा खर्च करणे शक्‍य नाही. त्यामुळे सोयी-सुविधा पुरविण्यासाठी पाच लाख रुपयांपर्यंत स्वतंत्र पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why Popatrao Pawar asked for a package to the Gram Panchayat