esakal | तहसीलदार, पोलिस निरीक्षक धावले जामखेडकरांच्या मदतीला

बोलून बातमी शोधा

अॉक्सीजन सिलिंडर

तहसीलदार, पोलिस निरीक्षक धावले मदतीला

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

जामखेड : जामखेडमध्ये ऑक्‍सिजन सिलिंडरची स्थिती गंभीर बनली आहे. दोनदा खासगी कोविड सेंटरमधील ऑक्‍सिजन संपेल, अशी स्थिती निर्माण झाली. मात्र, येथील स्थानिक प्रशासनातील संकटमोचक म्हणून तहसीलदार व पोलिस निरीक्षक मदतीला धावल्याने रुग्णांचे प्राण वाचले.

जामखेडला पाच कोविड सेंटर आहेत. तेथे साडेसहाशे रुग्ण उपचार घेत आहेत. पैकी तब्बल दोनशे रुग्ण ऑक्‍सिजन बेडवर आहेत. त्यामुळे जामखेडकरांना दररोज दोनशे ऑक्‍सिजन सिलिंडरची गरज भासत आहे. नगर येथून त्याचा पुरवठा होतो.

मात्र, मागणी पूर्ण करताना प्रशासनाच्या नाकी नऊ येत आहे. ऑक्‍सिजन पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले की प्रशासनासह कोविड सेंटर चालक ऑक्‍सिजनवर येतात. असेच दोन प्रसंग या आठवड्यात अनुभवयास आले. मात्र या दोन्ही वेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी लढविलेल्या क्‍लृप्तीमुळे कोरोना संकटातून नागरिकांचे प्राण वाचले.

त्यांनी स्वतःला झोकून देऊन काम केले. पोलिस व महसूल कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन संपूर्ण तालुका पिंजून काढला आणि लहान-मोठ्या व्यवसायिकांकडे उपलब्ध असलेले ऑक्‍सिजन सिलिंडर मिळविले अन्‌ वेळेत कोविड सेंटरला पुरविले. त्यामुळे संकट टळले. मागचा धडा घेवून खासगी कोविड सेंटरचालकांनी आता तरी पर्यायी व्यवस्था उभी करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

"जय श्रीराम'ने दिले एक लाख

हळगाव (ता.जामखेड) येथील जय श्रीराम शुगर फॅक्‍टरीला भेट देऊन त्यांच्याकडून चौदा ऑक्‍सिजन सिलिंडर आणले. तसेच आरोळे कोविड सेंटरला आर्थिक मदत करण्याचा प्रस्ताव लेखापाल सोमनाथ शिंदे यांच्या समोर मांडला. त्यांनी शुक्रवारी (ता.23) रोजी एक लाख रुपयांची मदत रवी आरोळे यांच्याकडे सुपूर्द केली.