चंद्रकला यांनी जोरात आरडाओरडा केल्याने, परिसरातील ग्रामस्थांनी लांडग्याला पिटाळले. त्यानंतर या लांडग्याने अर्जुन मच्छिंद्र गुळवे यांच्या दोन गायी, वासरू व शेळीवर हल्ला केला. यात सर्व पाळीव जनावरे जखमी झाली.
संगमनेर : तालुक्यातील रणखांब येथील लांडगदरा परिसरात लांडग्याने धुमाकूळ घालून आजीसह तिच्या नातीला गंभीर जखमी केले. त्याने पाळीव जनावरांवरही हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (ता. दोन) दुपारी दीडच्या सुमारास घडली.
रणखांब परिसरात अद्यापही मोठ्या प्रमाणात जंगली हिंस्र श्वापदांचे अस्तित्व आहे. शुक्रवारी दुपारी घराच्या अंगणात काम करीत बसलेल्या चंद्रकला गोरख गुळवे व त्यांची नात ऋतुजा यांच्यावर लांडग्याने हल्ला चढवला. यात चंद्रकला यांच्या डाव्या हाताचे बोट तोडून पंजालाही जोराचा चावा घेतला, तर नात ऋतुजा हिची मान, चेहरा व हाताला चावा घेऊन तिला गंभीर जखमी केले.
चंद्रकला यांनी जोरात आरडाओरडा केल्याने, परिसरातील ग्रामस्थांनी लांडग्याला पिटाळले. त्यानंतर या लांडग्याने अर्जुन मच्छिंद्र गुळवे यांच्या दोन गायी, वासरू व शेळीवर हल्ला केला. यात सर्व पाळीव जनावरे जखमी झाली.
जखमी आजी व नातीवर संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत ग्रामस्थांनी वन विभागाला माहिती दिली असून, मानवी वस्तीवर उपद्रव करणाऱ्या या लांडग्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
संपादन - अशोक निंबाळकर