गावचा खरा विकास केंद्राच्या निधीतूनच सुरू आहे : भाजपचे खासदार डॉ. विखे पाटील

संजय आ. काटे
Saturday, 24 October 2020

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे नगर ते दौड व न्हावरा ते आढळगाव पर्यतच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्गी लागले आहे.

श्रीगोंदे (अहमदनगर) : केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे नगर ते दौड व न्हावरा ते आढळगाव पर्यतच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्गी लागले आहे. आता आढळगाव ते जामखेड दरम्यानच्या कामासाठी 430 कोटीचा खर्च अपेक्षित आहे हे दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. गावचा खरा विकास केंद्राच्या निधीतूनच सुरू आहे, असा टोला भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लगावला आहे. 

काष्टी येथे न्हावरा ते आढळगाव पर्यंतच्या 216 कोटी 51 लाख खर्च अपेक्षित कामाचे भुमीपुजन डॉ. विखे पाटील यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार बबनराव पाचपुते होते. 

विखे पुढे म्हणाले, नगर दौंड राष्ट्रीय महामार्गाचे काम माजी खासदार दिलीप गांधी व आमदार बबनराव पाचपुते यांच्या प्रयत्नाने झाले आहे. चार राष्ट्रीय मार्ग श्रीगोंद्यातून गेल्याने श्रीगोंद्याला वेगळे वैभव प्राप्त होणार आहे. केंद्र गावचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

पाचपुते म्हणाले, विकास कामात विखे यांचे सहकार्य लाभत आहे.  डिंबे माणिकडोह बोगदा याकडे लक्ष द्यावे लागेल. भीमा नदी पट्ट्यात भविष्यात पाणी टंचाई जाणवणार आहे त्यासाठी पावले उचलावी लागणार आहेत. राजेंद्र नागवडे, भगवानराव पाचपुते,  केशव मगर, आण्णा शेलार, दत्तात्रय पानसरे, सदाशिव पाचपुते, जिजाबापू शिंदे, बाळासाहेब नाहाटा, अनिल पाचपुते,  सुवर्णा पाचपुते, बाळासाहेब गिरमकर, राकेश पाचपुते, विठ्ठलराव काकडे, सुनील पाचपुते,  वैभव पाचपुते उपस्थित होते. संदिप नागवडे यांनी सूत्रसंचालन केले. सदाशिव पाचपुते यांनी आभार मानले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Work on National Highway in Shrigonda taluka started