निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद

शांताराम काळे
Tuesday, 22 December 2020

संतप्त शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ देऊ नका. शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर केल्यावरच कालव्याचे काम सुरू करा, अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा पिचड यांनी दिला.

अकोले : तालुक्‍यातील मेहेंदुरी येथील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे काम सोमवारी (ता.21) शेतकऱ्यांनी एकत्र येत बंद पाडले. माजी आमदार वैभव पिचड यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. 

मेहेंदुरी फाटा ते फरगडे वस्तीपर्यंत निळवंडे डाव्या कालव्याचे काम सुरू आहे. मात्र, ठेकेदार बेजाबदारपणे हे काम करीत असून, कॉलव्यालगतच्या शेतकऱ्यांना वेठीस धरीत आहे.

ठेकेदाराने अनेक ठिकाणी शिवार रस्ते खोदल्याने शेतकऱ्यांचा ऊसतोडणीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी पाइपलाइन उखडल्या आहेत. शेतकऱ्यांच्या घराशेजारीच 10-15 फूट खोल खड्डे केल्याने त्यात जनावरे व छोटी मुले पडून जखमी झाली आहेत.

शेतकऱ्यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कल्पना दिल्यावरही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर पिचड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले. 

हेही वाचा - महादेव जानकरांना दोन खासदार, ५० आमदार निवडून आणायचेत

संतप्त शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ देऊ नका. शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर केल्यावरच कालव्याचे काम सुरू करा, अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा पिचड यांनी दिला.

उपसरपंच संजय फरगडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, भाजपचे सरचिटणीस यशवंत आभाळे, अमोल येवले, सुधाकर आरोटे, राहुल देशमुख, विकास बंगाळ, कैलास आरोटे, नजिम शेख, पांडुरंग फरगडे, विलास येवले, भाऊसाहेब येवले आदी उपस्थित होते. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The work of Nilwande dam canal was stopped by the farmers