अतिक्रमणांमुळे रखडले शिर्डी- हैदराबाद राज्यमार्गाचे काम

राजेंद्र सावंत
Monday, 28 September 2020

पाथर्डी शहरातून जाणाऱ्या राज्यमार्गाचे काम चक्क अतिक्रमणधारकांनी रोखले आहे.

पाथर्डी (अहमदनगर) : शहरातून जाणाऱ्या राज्यमार्गाचे काम चक्क अतिक्रमणधारकांनी रोखले आहे. प्रांताधिकारी, तहसीलदार, तसेच पालिकेने संबंधित दुकानदारांना, वाढीव बांधकाम काढून घेण्यास तीन वेळा समज देऊनही त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे, प्रगतिपथावर असलेले राज्यमार्गाचे काम रखडले आहे. कल्याण- विशाखापट्टणम, तसेच शिर्डी- हैदराबाद, बारामती- औरंगाबाद आदी महत्त्वाचे मार्ग शहरातून जातात. 

जिल्ह्यातील शिर्डी, राहुरी, तिसगाव, पाथर्डी, चिंचपूर इजदे आदी गावांतून हैदराबादकडे जाणारा शिर्डी-हैदराबाद राज्यमार्ग शहरातील नाईक चौक, अजंठा चौकमार्गे मोहटा, चिंचपूर इजदेकडे जातो. नाईक चौक ते अजंठा चौक, तसेच चिंचपूर रस्त्याचे काम सध्या रखडले आहे. अन्य रस्त्यांचे काम प्रगतिपथावर असून, पूर्णत्वाकडे जात असताना अतिक्रमणधारकांमुळे त्याला खीळ बसली. 

प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नामदेव पाटील, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी तीन वेळा समक्ष जाऊन, अतिक्रमण काढून घेण्याबाबत संबंधितांना सांगितले. मात्र, परिस्थिती "जैसे थे' आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Work on Shirdi Hyderabad state highway stalled due to encroachments