कचरामय शहर, खड्डेमय रस्ते; श्रीरामपुरात कामगारांचे काम बंद

गौरव साळुंके
Saturday, 31 October 2020

सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वेतन थकल्याने गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कामगारांनी काम बंद केले.

श्रीरामपूर (अहमदनगर) : सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वेतन थकल्याने गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कामगारांनी काम बंद केले. त्यामुळे शहरातील नेवासे रस्ता, संगमनेर रस्ता, गोंधवणी रस्ता, शिवाजी रस्त्यासह शहर परिसरातील मोकळ्या जागांत उघड्यावर कचऱ्याचा खच साचला आहे.

कचरा उचलण्यासाठी अनेक भागांत नियमित घंटागाडी येत नसल्याने नागरिक बेजबाबदारपणे उघड्यावर कचरा टाकतात. विविध रस्त्यांवर, मोकळ्या जागांत, तसेच विविध मैदानांसह चक्क रस्तादुभाजकांवर सर्रास कचरा टाकण्याची वाईट सवय नागरिकांना लागली आहे. त्यामुळे शहर कचरामय झाल्याने, सर्वत्र मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. 

उघड्यावर पडलेला कचरा खाण्यासाठी मोकाट कुत्री आणि मोकाट जनावरे रस्त्यावर फिरतात. परिणामी अपघातांना निमंत्रण मिळते. त्यात आणखी भर म्हणून शहरासह तालुक्‍यातील खड्डेमय रस्त्यांमुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. स्वच्छता कामगारांनी काम बंद केल्याने नियमित साफसफाई होत नसल्याच्या तक्रारी विविध भागांतील नागरिक करीत आहेत. त्यामुळे गुरुवारी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी संबंधित ठेकेदाराला अनामत रक्कम देऊन स्वच्छता सुरू करावी, तसेच टप्प्याटप्प्याने देयके अदा केली जाणार असल्याच्या सूचना दिल्या. मात्र, त्यानंतरही शहरात सर्वत्र कचरा साचल्याचे दिसून येते. 

शहराच्या अनेक भागांतील नागरिक उघड्यावर कचरा टाकतात. उघड्यावर फेकलेला कचरा आरोग्य धोक्‍यात आणत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांत नियमित साफसफाई होत नाही. एकीकडे कोरोनाच्या संकटात सर्वत्र स्वच्छतेचे महत्त्व पटले, तर दुसरीकडे शहरात सर्वत्र कचरामय वातावरण पाहायला मिळते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पालिकेने शहरस्वच्छतेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या संकटात विविध ठिकाणी बाजार भरण्याची संकल्पना पुढे आली. 
उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांवर पालिकेकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने, शहरातील सर्वच रस्तादुभाजके कचराकुंड्या बनली आहेत. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Work stoppage agitation of contract workers in Shrirampur Municipality