संविधान वाचनाचा "वर्ल्ड रेकॉर्ड'; एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या हस्ते रमेश बनसोडे यांना सन्मानपत्र

आनंद गायकवाड
Friday, 1 January 2021

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या 360 एक्‍सप्लोरर संस्थेतर्फे राज्यातील विविध वयोगटातील साहसवीरांसमवेत प्रजासत्ताकदिनानिमित्त 26 जानेवारी २०२० रोजी सर्वोच्च कळसूबाई शिखरावर यशस्वी चढाई केली होती.

संगमनेर (अहमदनगर) : एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या 360 एक्‍सप्लोरर संस्थेतर्फे राज्यातील विविध वयोगटातील साहसवीरांसमवेत प्रजासत्ताकदिनानिमित्त 26 जानेवारी २०२० रोजी सर्वोच्च कळसूबाई शिखरावर यशस्वी चढाई केली होती.

या शिखरावर राष्ट्रध्वज फडकावून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले होते. या उपक्रमाची दखल हैदराबाद येथील संस्थेने घेतली असून, त्याची नोंद "हाय रेंज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये करण्यात आली. या विक्रमाचे सन्मानपत्र व पदक येथील रमेश बनसोडे यांना एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
प्रसिध्द गिर्यारोहण, ट्रेकींग खेळाडू आनंद बनसोडे यांच्या 360 एक्‍सप्लोरर या संस्थेमार्फत व त्यांच्या नेतृत्वाखाली विविध वयोगट, व क्षेत्रातील 65 जणांनी समुद्रसपाटीपासून 1646 मीटर्स उंचीच्या सर्वोच्च शिखर असलेल्या कळसूबाई मोहिमेचे आयोजन केले होते. यात सुमारे 10 महिला व युवतींसह चार ते पाच वर्ष वयाच्या दोन छोट्या बालिका व 27 महिने वयाच्या अक्षन या मुलाचा समावेश होता.

राज्यातून बीड, नंदूरबार, सोलापूर, लातुर, नांदेड, पुणे, नाशिक, परभणी आदी जिल्ह्यांतील साहसवीरांसह संगमनेरातील रमेश बनसोडे, राहुल बनसोडे, बालाजी लालपोतु या मोहिमेत सामिल झाले होते. 
संविधानाच्या उद्देशिकेचे शाळांमध्ये वाचन करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी संविधान दिनाचे औचित्य साधून या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

कळसुबाईच्या सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकावून या चमुने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. त्यांच्या या उपक्रमाची दखल हैदराबाद येथील संस्थेने घेतली असून, याची नोंद हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Record of Constitution Reading