‘बापूं’च्या शैक्षणिक कार्याचा वसा चालवू : राजेंद्र नागवडे

संजय आ. काटे
Tuesday, 8 December 2020

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी शिवाजीराव नागवडे (बापू) यांनी शिक्षण संस्थांचे जाळे निर्माण केले.

श्रीगोंदे (अहमदनगर) : तालुक्‍यातील प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी शिवाजीराव नागवडे (बापू) यांनी शिक्षण संस्थांचे जाळे निर्माण केले. त्यांच्या शैक्षणिक कार्याचा वसा अखंडपणे पुढे चालवू, अशी ग्वाही नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.

तालुक्‍यातील पेडगाव येथील श्री छत्रपती संभाजी विद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन नागवडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना नागवडे म्हणाले, ‘ग्रामीण भागातील शिक्षणाची गैरसोय ओळखून बापूंनी शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण केले. विद्यालये, महाविद्यालये, राज्याच्या ग्रामीण भागातील पहिले पॉलिटेक्‍निक सुरू केले. या संस्थांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. कित्येक विद्यार्थ्यांचे जीवन घडले. शैक्षणिक कार्याचे त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. पेडगावच्या इतिहासाला साजेशी विद्यालयाची इमारत बांधणार असून, अंदाजे दीड कोटी रुपये खर्चाची ही इमारत लवकरच पूर्ण होईल.''

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, संस्थेचे विश्वस्त राजकुमार पाटील, अरुण पाचपुते, शिवाजी जगताप, प्रा. सुनील माने, ऍड. सुनील भोस, राकेश पाचपुते, विजय कापसे, ऍड. अशोक रोडे, बाबासाहेब इथापे, सरपंच सुलोचना कणसे, देविदास शिर्के, प्रशांत ओगले आदी उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worship of Shri Chhatrapati Sambhaji Vidyalaya building in Pedgaon