कौटुंबिक आरोपांचे राजकीय भांडवल दुर्दैवी - यशवंतराव गडाख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yashwantrao Gadakh

मागील पन्नास वर्षांच्या राजकीय वाटचालीत कधी नव्हे ते सध्या असलेल्या तालुक्यातील विरोधकांनी राजकीय पोळी भाजण्यासाठी आमच्या कुटुंबातील दुःखद प्रसंगाचे केलेले राजकीय भांडवल दुर्दैवी आहे.

Yashwantrao Gadakh : कौटुंबिक आरोपांचे राजकीय भांडवल दुर्दैवी

सोनई - मागील पन्नास वर्षांच्या राजकीय वाटचालीत कधी नव्हे ते सध्या असलेल्या तालुक्यातील विरोधकांनी राजकीय पोळी भाजण्यासाठी आमच्या कुटुंबातील दुःखद प्रसंगाचे केलेले राजकीय भांडवल दुर्दैवी आहे. संस्था उभ्या करून लोकहिताचे कार्य करण्याऐवजी त्या मोडण्यासाठी सुरू असलेला डाव हजारोंच्या प्रपंचांत माती कालविणारा आहे, अशी टीका ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे नाव न घेता केली.

नेवासे तालुका दूध संघातील दहा वर्षांपूर्वीच्या वीजचोरीप्रकरणी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मृत्यूशी झुंज देत असलेल्या प्रशांत पाटील गडाख यांच्यासह अठरा संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल केल्यानंतर आमदार शंकरराव गडाख यांनी बोलाविलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. भय्यासाहेब देशमुख, नानासाहेब रेपाळे, ‘मुळा’चे अध्यक्ष नानासाहेब तुवर, कडुबाळ कर्डिले, जबाजी फाटके, विश्वासराव गडाख आदी उपस्थित होते.

आमदार गडाख म्हणाले, की दूध संघातील वीजमीटरवर महावितरणचे नियंत्रण होते. अनेकदा केलेल्या तपासणीत कधीच वीजचोरी आढळली नसताना, राजकीय द्वेषातून विरोधकांनी हे कुभांड रचल्याचा आरोप त्यांनी केला.

राजसत्तेच्या माध्यमातून तालुक्यातील कल्याणकारी संस्था बंद पाडण्याचे षडयंत्र विरोधकांकडून रचले जात असल्याच्या आरोप करून, जिल्ह्याच्या साखर कारखानदारीत मुळा कारखान्याचे सर्वांत कमी प्रदूषण असतानाही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे खोट्या तक्रारी दिल्या आहेत. भावजय गौरी प्रशांत गडाख, त्यानंतर प्रतीक काळे आकस्मिक मृत्यू प्रकरणी आमदार गडाख यांनी उपस्थितांसमोर सत्य भूमिका स्पष्ट करून, त्यांच्या मृत्यूचे भांडवल करून आपल्या कुटुंबाला कसा मानसिक व कायदेशीर त्रास दिला, हे सांगितले.

प्रास्ताविक कारभारी जावळे यांनी केले. काकासाहेब गायके, सोपान महापूर, बाळासाहेब शिंदे, श्रीरंग हारदे, शरद आरगडे, शरद जाधव, जानकीराम डौले, अशोक गायकवाड आदींनी आपल्या भाषणात संघटनेच्या पाठीशी असल्याचे सांगितले, तसेच खरपूस शब्दांत माजी आमदार मुरकुटे यांचा समाचार घेतला. डॉ. रामनाथ बडे यांनी सूत्रसंचालन केले.

स्वाभिमान आणि भिंगरी

राजकीय सत्तांतरात अपक्ष आमदार असल्याने मंत्रिपद टिकवून ठेवू शकलो असतो, मात्र तालुक्यातील जनतेचा स्वाभिमान म्हणून कुठला निर्णय घेतला नसल्याचा खुलासा आमदार गडाख यांनी केला. ज्येष्ठ नेते गडाख यांनी प्रशांत गडाख कोमात असताना फौजदारी दाखल करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे, की तो नीट असता, तर तुमची भिंगरी केली असती, असा टोला तालुक्यातील विरोधकांना लगावताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

टॅग्स :Ahmednagarpoliticalfamily