Akola News : अलंग गडावर टाकं साफ करुन वाढदिवस साजरा

सर्वजण एका टाक्या भोवती जमले. अंगावरील शर्ट काढले.. शिवरायांचा जयघोष करीत सर्वजण कामाला भिडले.
youth celebrate his birthday as clean alang fort
youth celebrate his birthday as clean alang fortSakal

अकोले : घाटघर येथील एका तरुणाने आपला वाढदिवस अलंग गडावरील अनेक वर्षांपासून माती, दगडाने बंद असलेले भलं मोठं पिण्याच्या पाण्याचे टाकं साफ करून साजरा केला. अंग भाजून काढणाऱ्या उन्हात आठ साथीदारांच्या मदतीने ‘त्याने’ हे दिव्य पार पाडलं. पावसाळ्यात या टाक्यात आता तीस हजार लिटर पाणी साठणार असून पशुपक्षी, प्राण्यांची तहान भागणार आहे.

एकनाथ खडके असे या तरुणाचे नाव आहे. कळसुबाई-हरिश्चंद्रगड पट्ट्यातील खडानखडा माहिती असलेला अकोले तालुक्यातील दुर्गम भागात राहणारा घाटघरचा हा रहिवासी आहे. अत्यंत शांत, संयमी पण अतिशय उत्साही असलेल्या या तरुणाने आपला वाढदिवस अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करुन अनेकांचे लक्ष वेधून घेतले. मे महिना..रणरणतं ऊन..सकाळी आठनंतर बाहेर पडायचा विचार सुद्धा मनाला शिवत नाही.

कारण, डोक्यावर आग ओकणारा सूर्य. तो मात्र आठ जणांना घेऊन भल्या पहाटे बाहेर पडतो. सोबत टिकाव, फावडे, टोकऱ्या, प्रहार आणि भाजी-भाकरी. गडावर पोहोचता पोहोचता सूर्याने तोंड उघडले होते. ते आग ओकण्यासाठीच.

सर्वजण एका टाक्या भोवती जमले. अंगावरील शर्ट काढले.. शिवरायांचा जयघोष करीत सर्वजण कामाला भिडले. या मावळ्यांच्या हातातल्या टिकाव, फावडे आणि पहारी तलवारीसारख्या सपासप चालू झाल्या.

सूर्यनारायण यांची अग्नीपरीक्षाच घेत होता. घामाने अंग निथळत होते. पण, जिद्दीने पेटलेल्या या मावळ्यांचे हात मात्र थांबत नव्हते. दुपारचा एक वाजला. पोटाची भूक भागवण्यासाठी सर्वजण जवळच्याच गुहेत गेले आणि शिदोरी सोडली. थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा भिडले. संध्याकाळी पाच वाजता हा रणसंग्राम थांबला.

२८ टाक्यांही स्वच्छ होणार

१२ फूट रुंद, १२ फूट लांब आणि ८ फूट उंच असलेलं आणि मातीने बुजलेलं टाकं हा हा म्हणता साफ झालं. अशा या ‘एकनाथ’ च्या डोक्यात काहीतरी चांगलं करावं, हे सतत घोळत असतं. ते प्रत्यक्ष कृतीत यावं याचा प्रयत्नही तो करत असतो. यासाठी मनुष्यबळ आणि आर्थिक बळ हे तर लागणारच.

त्याच्या या २८ टाक्यांच्या स्वच्छतेच्या मोहिमेला आपण सर्वांनी मिळून जसा जमेल तसा हातभार लावू या..आणि त्याच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यास सहकार्य करूया, असा नारा त्याच्या मित्रांनी दिला आहे.

अलंग-मदन-कुलंग हे तसे अवघड श्रेणीतले गड. अनेक ट्रेकर्सचं ते एक स्वप्न असतं. या गडांवर जाऊन येण्यासाठी सोबतीला हवा असतो तो विश्वासू आणि कसलेला गाईड. एकनाथ खडके सोबतीला असल्यावर हे अवघड ट्रेक्स अतिशय सहजपणे होऊन जातात, हा अनेकांचा अनुभव. त्याची फोटोग्राफी एखाद्या निष्णात फोटोग्राफर सारखी.

अलंग गडावरील हे भलं मोठं टाकं स्वच्छ केल्याबद्दल त्याचं अभिनंदन करण्यासाठी आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याला फोन केला. तेव्हा त्याने त्याचा ''फ्युचर प्लॅन'' सांगितला आणि मी थक्कच झालो. या गडावर एकूण २८ टाके आहेत आणि ही सर्वच्या सर्व टाकी त्याला स्वच्छ करायची आहेत. व्वा क्या बात है.

-विनायक वाडेकर, ट्रेकर्स, सामाजिक कार्यकर्ते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com