कचऱ्यात हरवले जिल्हा परिषदेचे औषधाचा साठा

दौलत झावरे
Wednesday, 6 January 2021

जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांसाठी लाल टाकी परिसरात इमारती बांधण्यात आल्या. त्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी 50 निवासस्थाने असून

नगर ः स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची वसाहत अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे. ग्रामीण भागाला पुरवठा करण्यात येणाऱ्या औषधांचा साठा केलेल्या सभागृहालाच कचऱ्याने वेढा घातला आहे. 

जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांसाठी लाल टाकी परिसरात इमारती बांधण्यात आल्या. त्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी 50 निवासस्थाने असून, पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र पाच निवासस्थाने आहेत.

याच ठिकाणी अधिकारी-कर्मचाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांसाठी त्या काळी बॅडमिंटन हॉल उभारला होता. मात्र, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात औषधे ठेवण्यास जागा नसल्याने गेल्या काही वर्षांपासून या हॉलमध्ये साठा केला जात आहे.

हेही वाचा - नियती किती क्रूर असते बघा

तालुक्‍यातून मागणी आल्यानंतर येथून संबंधित तालुक्‍यात औषधांचा पुरवठा केला जातो. या हॉलला सध्या कचऱ्याने वेढा घातला आहे. 
विशेष म्हणजे, या परिसरात जिल्हा परिषदेचे अनेक अधिकारी राहत असताना, त्यांचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

 

औषधपुरवठ्याबाबतच्या नियमावलीचे पालन करून तो ठेवणे गरजेचे आहे. सर्व नियमांचे पालन झाले की नाही, याची चौकशी करणे गरजेचे आहे. औषधसाठा असलेल्या ठिकाणी कचऱ्याचे ढिग साठूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होणे ही गंभीर बाब आहे. 
- राजेश परजणे, जिल्हा परिषद सदस्य 

जिल्हा परिषदेच्या निवासस्थानी रेकॉर्डवर असलेल्या बॅडमिंटन हॉलमध्ये आरोग्य विभागालाला औषधे ठेवण्यास जागा नसल्याने ती औषधे तेथे ठेवली आहेत. या परिसराची साफसफाई नेहमीच केली जाते. आता झालेला कचरा बांधकाम विभागाला सांगून परिसर स्वच्छ करण्यात येईल. 
- वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी. 

औषधे नेणाऱ्यांना कुरकूर 
अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी असलेल्या बॅडमिंटन हॉलमधून औषधे नेण्यासाठी आठवड्यातून दोन-तीन दिवस वाहने रात्री-अपरात्री येतात. वाहनचालकांना येथे राहणारे काही जण नेहमीच रात्री-अपरात्री येऊ नका, असे सांगून येथे येण्यास मज्जाव केला जातो.  अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zilla Parishad medicine stock lost in waste