
Ahmednagar News : अनुकंपा भरतीच्या ‘झेडपी’त हालचाली
अहमदनगर : जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रिया राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रशासनाकडून तशी तयारी सुरू आहे. विविध विभागांकडे जून २०२२ अखेर सुमारे २७३ रिक्त पदे आहेत.
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ही भरती केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सर्व विभागांना तसे आदेश दिले आहेत. त्यानुसार रिक्त पदांबाबत माहिती मागविली जात आहे.
जिल्हा परिषदेकडे अनुकंपा तत्त्वावरील जागांसाठी ३८४ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यातील १३५ उमेदवारच पात्र झाले आहेत. १४६ उमेदवार अपात्र ठरले आहेत. १०३ उमेदवारांचे अर्ज अपूर्ण होते. या भरती प्रक्रियेकडे संबंधित उमेदवारांचे डोळे लागले आहेत.
सर्वसाधारण फेब्रुवारी किंवा जुलै महिन्यात अनुकंपा तत्त्वावरील पदे भरली जातात. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ते अधिकार आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार आणि पात्रतेनुसार नियुक्ती दिली जाते. बऱ्याचदा उमेदवार ठरावीक जागांसाठी अडून राहतात. त्यामुळे त्यांची वयोमर्यादा वाढत जाते.
शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्त्वानुसार नियुक्ती दिली जाते. मात्र, त्याने त्या पदासाठीची पात्रता पूर्ण करणे आवश्यक असते. २१ सप्टेंबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार भरती प्रक्रिया राबविली जाते. ही भरती प्रक्रिया जिव्हाळ्याचा विषय असतो. विविध पदांसाठी आतापर्यंत सुमारे ४०० जणांनी अर्ज केले आहेत. रिक्त पदांची आकडेवारी कमी-जास्त होऊ शकते.
कोण करू शकतो अर्ज?
दिवंगत शासकीय कर्मचाऱ्याची पत्नी-पती, मुलगा-मुलगी, मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेले अपत्य, मुलगा हयात नसेल किंवा तो नियुक्तीसाठी पात्र नसेल, तर त्याची सून, घटस्फोटित मुलगी किंवा बहीण, परित्यक्ता मुलगी किंवा बहीण, विधवा मुलगी किंवा बहीण, केवळ मृत कर्मचाऱ्यावर अवलंबून असलेला भाऊ किंवा बहीण आदी नातेवाइकांना अनुकंपा तत्त्वावर भरतीसाठी अर्ज करता येतो. अर्थात या नातेवाइकांकडे संबंधित पदासाठीची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक असते.
सीईओंचे सकारात्मक पाऊल
एकूण पावणेतीनशेपैकी गेल्या वर्षी जुलै महिन्यात ३० उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. नगरमध्ये रुजू झाल्यापासून मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी अनुकंपासह सर्वच कारभारात सकारात्मक पावले उचलली आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर भरती प्रक्रिया राबविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
संवर्गनिहाय रिक्त पदे
सामान्य प्रशासन ः वरिष्ठ सहायक ०, कनिष्ठ सहायक - ५. पशुसंवर्धन विभाग ः पशुधन पर्यवेक्षक ४. सा. बां. उत्तर ः स्थापत्य अभियंता सहायक ०, कनिष्ठ अभियंता २. अर्थ विभाग ः वरिष्ठ सहायक लेखा ३, कनिष्ठ सहायक लेख १, कनिष्ठ लेखाधिकारी ०. शिक्षण विभाग प्राथमिक ः शिक्षण सेवक मराठी ७७, उर्दू ३. ग्रामपंचायत विभाग ः ग्रामसेवक ०, विस्तार अधिकारी पंचायत ०, विस्तार अधिकारी सांख्यिकी १. महिला व बालकल्याण विभाग ः अंगणवाडी पर्यवेक्षिका १, विस्तार अधिकारी सांख्यिकी ०. आरोग्य विभाग ः औषध निर्माण अधिकारी १, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ०, आरोग्य सेवक महिला १०७, आरोग्य सेवक (फवारणी) ३७. कृषी विभाग ः विस्तार अधिकारी ०, सामान्य प्रशासन (क गट)- परिचर ३१.