
कोरोना विषाणू कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे आर्थिक व्यवहारांशी संबंधित काही बाबींना केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत मुदत वाढ दिली आहे. या मुदतीत ही कामे पूर्ण न केल्यास आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
अकोला : कोरोना विषाणूमुळे देशात तब्बल 70 दिवसांपेक्षा अधिक काळ सर्व व्यवहार ठप्प होते. विशेषतः शासकीय कार्यालयांशी संबंधित कामे करण्यात नागरिकांना आलेल्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाने नागरिकांना दिलासा देत आर्थिक व्यवहारांशी संबंधित बाबींची पूर्तता करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यातील काही बाबींची मुदत ही 31 मार्च तर पॅन कार्डशी आधारकार्ड लिंक करण्याची मुदत 31 मेपर्यंतच होती.
पंतप्रधान गरीब कल्याण पॅकज, आरबीआयद्वारे कर्ज सवलती, केंद्र सरकारचे आत्मनिर्भर भारत आर्थिक पॅकेज आदींच्या माध्यमातून सर्वसामान्यांना लॉकडाउनमध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न अलीकडच्या काही आठवड्यांमध्ये करण्यात आला. त्यातच आर्थिक व्यवहारांशी संबंधित अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी 30 जूनपर्यंतची मुदतवाढ देवूनही सरकारने नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आता या दिलेल्या मुदतीत ही कामे पूर्ण न केल्यास त्यानंतर आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.
अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी करा क्लिक
पॅन कार्डशी लिंक करा आधारकार्ड
तुमचे पॅन कार्ड आधारकार्डशी लिंक करणे बंधनकारक आहे. त्यासाठीची मुदत 30 जून आहे. यापूर्वी आधारकार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली होती. आता 30 जूनपूर्वी पॅन कार्डशी आधारकार्ड लिंक करून घ्यावे.
कर बचत योजनेत गुंतवणूक
आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये कर बचत योजनेत गुंतवणूक करून त्याचा लाभ घेण्यासाठीची मुदत 31 मार्च 2020 होती. त्याला मुदतवाढ देण्यात आली असून, आता 30 जूनपर्यंत कर बचत योजनेत गुंतवणूक केल्यास कर सवलतीचा लाभ घेता येणार आहे. तुम्ही 30 जूनपर्यंत 80 सी आणि 80 डी नुसार कर सलवत योजनेत उपलब्ध असलेल्या योजनांचा लाभ घेवू शकता.
पीपीएफ खाते पाच वर्षे सुरू ठेवा
पीपीएस खाते 31 मार्च 2020 रोजी म्यॅच्यूअर झाले असेल तर असे खाते पुढील पाच वर्षांसाठी सुरू ठेवण्याकरिता 30 जूनपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.
फॉर्म 16 साठी मुदतवाढ
कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्षातील फॉर्म 16 देण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. इनकम टॅक्स रिर्टन भरण्यासाठी आवश्यक असलेला हा फॉर्म 16 साधारणतः मेमध्ये कर्मचाऱ्यांना दिला जातो. यावर्षी केंद्र शासनाने हा फॉर्म वितरित करण्यासाठी 15 ते 30 जूनपर्यंतची मुदत दिली आहे.