वीस हजार घरांतील एक लाख नागरिकांचे तपासले आरोग्य

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणांतर्गत 8 जूनपर्यंत मनपा हद्दीतील 20 हजार 93 घरांतील 1 लाख 692 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

अकोला : महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणांतर्गत 8 जूनपर्यंत मनपा हद्दीतील 20 हजार 93 घरांतील 1 लाख 692 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यातून एका सारीच्या रुग्णासह 200 जणांना कोरोना चाचणीसाठी संदर्भित करण्यात आले असून, 296 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.

 

अकोला महानगरपालिका हद्दीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी मनपा हद्दीतील प्रत्येक घरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कंटेन्मेंट झोनमधून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी सुरू करण्यात आली आहे. सोमवार, ता. 8 जूनपर्यंत अकोला शहरातील 118 परिसरातील 20 हजार 93 घरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. त्यात एकूण 1 लाख 692 नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. त्यात 296 नागरिक हे कोविड-19 विषाणू संसर्ग झाल्याचे आढळून आले. इतर 200 नागरिक हे हायरिक्समध्ये असल्याने त्यांना कोरोना चाचणीसाठी संदर्भित करण्यात आले आहे. याशिवाय एक रुग्ण हा सारीचा आढळून आल्याने त्यालाही उपचारासाठी दाखल केले.

 

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

223 पथकांद्वारे सर्वेक्षण
मनपा हद्दीत नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी 223 पथके कार्यरत आहेत. त्यांच्याकडून आतापर्यंत 118 परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या पथकांकडून गंभीर आजार असलेल्या नागरिकांसह दोन महिन्यात सर्दी,ताप, खोकला झाला होता काय, प्रवास केला आहे काय आदीं माहिती घेत आहेत. याशिवाय ऑक्सिमीटरद्वारे नागरिकांची तपासणी केली जात आहे.

 

अजित पवार साहेब दुजाभाव करू नका, विदर्भातील वारकऱ्यांनाही परवानगी द्या....

साठी ओलांडलेले सव्वाचार हजार नागरिक
मनपाद्वारे सोमवार, ता. 8 जूनपर्यंत करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये 60 किंवा त्यापेक्षा अधिक 4 हजार 295 नागरिकांचीही आरोग्य तपासणी करण्यात आली. याशिवया सर्वेक्षण करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये उच्च रक्तदाबाचे 928 तर मधुमेहाचे 834 रुग्ण आढळून आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Checked health of one lakh citizens in twenty thousand households