खुशखबर! प्लाझ्मा थेरपीसाठी तब्बल एवढ्या कोरोनामुक्तांची संमती; गंभीर कोरोनाबाधित रुग्णांचा जीव वाचण्यास होणार मदत

भगवान वानखेडे
Sunday, 21 June 2020

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढ्यांना प्लाझ्मा थेरपीच्या उपचारासाठी परवानगी दिली आहे.

अकोला : कोविड 19 या विषाणूवर सध्यातरी कोणतीही लस अथवा औषध निघाले नाही. तरी प्लाझ्मा थेरपी कोविड 19 आजारावर उपचाराच्या दिशेने एक आशेचा किरण मानली गेली आहे. इतर जिल्ह्याप्रमाणे अकोल्यातही प्लाझ्मा थेरपीचा उपचार केला जाणार आहे. त्यासाठी 17 ते 20 कोरोनामुक्त डोनरने पसंती दर्शवली आहे. त्यामुळे गंभीर कोरोनाबाधित रुग्णांचा जीव वाचण्यास मदत होणार आहे.

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढ्यांना प्लाझ्मा थेरपीच्या उपचारासाठी परवानगी दिली आहे. त्यामध्ये अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयाचा समावेश आहे. रक्तपेढीमध्ये रक्त घटक वेगळे करण्याची मशीन आलेली असून, ती पुढील तोन दिवसांत कार्यरत केली जाणार आहे. विशेष म्हणजे नोडल ऑफिर्सचीही परवानगी मिळाली असून, काही दिवसांतच प्लाझ्मा थेरपीच्या उपचारास सुरुवात होणार आहे.

हेही वाचा - अरे बापरे! एकाच दिवशी पाच कोरोना बळी; या जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूची संख्या 64 वर

प्लाझ्मा दान करणाऱ्या व्यक्तींसाठी या आहेत अटी

  • डोनर म्हणजे दाता रुग्णाने कोविड-19 शी यशस्वी लढा दिलेला असावा.
  • दाता पूर्णपणे बरा झाल्याच्या 14 दिवसांनंतरच त्याचे रक्त घेता येते.
  • त्याचे कोरोनाचे दोन रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच प्लाझ्मा घेऊ किंवा देऊ शकतो
  • प्लाझ्मा देणाऱ्या व्यक्तीने गेल्या तीन महिन्यात परदेश प्रवास केलेला असू नये.
  • डोनरला ताप किंवा श्वसनाशी संबंधित विकार असू नयेत. फिट असावा.

अशी आहे प्रक्रिया
एका डोनरच्या रक्तातून प्लाझा थेरपीद्वारे 400 मिली प्लाझ्मा काढता येईल. 200 मिलीच्या दोन बॅग तयार होतील. गंभीर कोरोनाबाधित रुग्णांना ते देण्यात येईल. एका वेळेस 200 मिली प्लाझाची पहिली बॅग, तर 24 तासांनंतर दुसरी बॅग दिली जाईल. त्या रुग्णाच्या शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी अँटीबाॅडीज तयार होतील. रुग्ण बरा होण्यास मदत होणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

22 ते 50 वयोगटातील व्यक्तींची निवड
कोविड महामाराचे संकट आलेले आहे. तरी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे प्रबोधन करून त्यांना प्लाझ्मा देण्यासाठी तयार केलेले आहे. एकूण 17 ते 20 जण तयार झालेले आहेत. कोरोनाबाधित मात्र बरे झालेल्यांचा प्लाझ्मा काढून गंभीर कोरोना बाधित रुग्णांना देण्यात येणार आहे. त्याचा जीव वाचण्यास मदत होईल. प्लाझ्मा थेरपीसाठी 22 ते 50 वयोगटातील व्यक्ती व कोणताही आजार नसलेल्यांची निवड केली आहे.

हे नेमकं कसं शक्य आहे?
एखादा विषाणू शरीरात शिरल्यास शरीर त्याला हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न करते. विषाणू आणि आपल्यात होणाऱ्या या लढाईत आपले सैनिक असतात ते अँटिबॉडीज. एका विशिष्ट विषाणूला मारण्यासाठी आपले शरीर विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीज तयार करते. या अँटीबॉडीज आपल्या रक्तातल्या प्लाझ्मामध्ये असतात. कोविडमधून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढू शकणाऱ्या अँटीबॉडीज मुबलक असतात. त्या काढून कोरोनाशी लढणाऱ्या एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या शरीरात सोडल्या तर मग त्या वृद्ध व्यक्तीचे शरीर कोरोनाशी चांगल्या पद्धतीने दोन हात करू शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Consent of a staggering 17 corona free patient for plasma therapy in akola