अकोल्यात कोरोनामुक्तीसाठी ‘मी सक्षम’

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 May 2020

शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढत असून, प्रादुर्भाव वाढू नये याकरिता ‘मी सक्षम’ या समूहातर्फे संपूर्ण शहर सॅनिटाइज करण्यात येणार आहे.

अकोला : शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढत असून, संपूर्ण शहरातील नागरिक हे कोरोनाच्या दहशतीखाली आले आहे. अशा परिस्थितीत अकोल्याला कोरोना मुक्त करण्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवत अकोल्यातील ‘मी सक्षम’ या समूहाने पुढाकार घेतला आहे.

 

 

शहरात विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता ‘मी सक्षम’ या समूहातर्फे संपूर्ण शहर सॅनिटाइज करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात शहरातील सर्व पोलिस स्टेशन, शासन मान्य प्राप्त असलेल्या होमिओपॅथी सेपिया 200 या औषधीने फवारणी करून सॅनीटाइज करणार असल्याचे समूहातर्फे सांगण्यात आले. सर्वोपचार रुग्णालय व लेडी हार्डिंग रुग्णालय तसेच सर्व निमशासकीय रुग्णालयात सुद्धा या औषधाची फवारणी करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर अकोला शहरातील सुमारे 80 हजार घर आणि 10 हजार वाणिज्यिक संकुलांमध्ये सुद्धा या औषधाची फवारणी करण्यात येणार आहे.

व्हिडिओद्वारे जनजागृती
नुकताच ‘मी सक्षम’ या समूहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात वायरल झाला आहे. सदर व्हिडिओद्वारे या समूहाने जनतेला मास्क वापरणे, सॅनिटाइजर वापरणे, सोशल डिस्टन्स ठेवणे असे नानाविध प्रकारचे संदेश देत जनजागृती केली आहे.

तरुणांचा समावेश
‘मी सक्षम’ या समूहाची स्थापना काही महिन्यांपूर्वी अकोल्यातील विविध व्यवसायाशी निगडीत असलेल्या तरुणांनी एकत्र येत केली. तरुणांना सक्षम बनविणे तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविणे हाच या समूहाचा मुख्य उद्देश होता. सदर उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत समूहाने वाटचाल करीत बरीच समाज उपयोगी कामे केली. आता शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता या समूहाने ॲक्शन प्लॅन आखला असून, तो कृतीत आणण्यास सुद्धा सुरुवात केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid-19 : Akola youth team Me Saksham sanitize city