अकोला शहरापासून 18 किलोमीटर लांब क्वारंटाईन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात ठेवण्यात आलेल्या या नागरिकांना कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. आपातकालीन वैद्यकीय व्यवस्थाही करण्यात आली नसल्याचे दिसून आले.

अकोला : महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना शहरापासून 18 किलोमीटर लांब असलेल्या गोरेगाव येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात ठेवण्यात आलेल्या या नागरिकांना कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. आपातकालीन वैद्यकीय व्यवस्थाही करण्यात आली नसल्याचे दिसून आले.

 

अकोला महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली जात आहे. त्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना संस्थात्मक अलिगकरणात ठेवण्यात येत आहे. त्यासाठी शहरातील खासगी व शासकीय जागा अधिग्रहित करण्यात आल्यात. त्यानंतरही शहरापासून 18 किलोमीटर लांब असलेल्या गोरगाव येथील सामाजिक न्याय विभागाच्या आश्रम शाळेत महानगरपालिका हद्दीतील 50 नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले. यात मुलं व महिलांचाही समावेश आहे. या ठिकाणी आरोग्य विभागाचा कोणताही कर्मचारी नियुक्त करण्यात आला नाही. ग्रामपंचायतच्या एका कर्मचाऱ्याला येथे बसविण्यात आले. कोणत्याही सुविधा देण्यात आल्या नाहीत. आरोग्याबाबत आपातकालीन व्यवस्थाही येथे करण्यात आली नाही. शहरातून रुग्णवाहिका पोहोचेपर्यंत गंभीर परिणाम येथे क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांना भोगावे लागू शकते. यावरून जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व आरोग्य विभागाकडून नागरिकांसाठी करण्यात येत असलेल्या सुविधांबाबत प्रशासन किती गंभीर आहे दिसून येते.

वंचितच्या नेत्यांना घेतली भेट
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे व युवा पदाधिकारी पराग गवई यांनी शनिवारी रात्रीच गोरेगाव येथील वसतिगृहात भेट देवून नागरिकांना क्वारंटाईन करताना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली. तेव्हा त्यांना तेथे कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याचे आढळून आले.

शहरातच व्यवस्था करण्याची मागणी
नागरिकांना क्वारंटाईन करण्याबाबतचे नियम शासनाने आखून दिले आहेत. अकोल्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे आले असताना त्यांनी जे नागरिक व्यवस्था करू शकतात, त्यांना खासगी हॉटेल किंवा घरी क्वारंटाईन करण्याची सूचना केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनीही खासगी हॉटेल अधिग्रहित केल्याचे जाहीर केले होते. त्यानंतरही शहरापासून 18 किलोमीटर लांब नागरिकांना क्वारंटाईन केले जात आहे. तेथे कोणत्याही सुविधा नाही. आरोग्यबाबत आपातकालीन उद्‍भवल्यास अकोल्यात रुग्णवाहिका पोहोचेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. लहान मुलंही येथे आहेत. त्यांचा व्यवस्था शासनाने अकोला शहरातच करावी, अशी मागणी डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Quarantine center 18 km from Akola city