अरे देवा ! शिक्षकासह फळ विक्रेत्याला कोरोनाची लागन; या तालुक्याची हॉस्पॉटकडे वाटचाल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

मंगळवारी बाळापूर शहरातील दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कागदीपुरा भागातील एका शिक्षकाचा व तपे हनुमान रोड वरील खतीब कॉलनीतील एका 62 वर्षीय व्यक्तीचा यामध्ये समावेश आहे. एकाच दिवशी दोन कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे.

बाळापूर (जि. अकोला) : दिवसेंदिवस बाळापूर शहरासह तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक होत असून, शहरात आणखीन दोन कोरोना बाधित रुग्णाची भर पडली आहे. दोन दिवसात आढळून आलेला हा कोरोनाचा तिसरा रुग्ण असून, आतापर्यंत शहरासह तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11 झाली आहे. त्यामुळे बाळापूरची वाटचाल आता व्हॉटस्पॉटकडे सुरू झाली आहे. मंगळवारी बाळापूर शहरातील दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कागदीपुरा भागातील एका शिक्षकाचा व तपे हनुमान रोड वरील खतीब कॉलनीतील एका 62 वर्षीय व्यक्तीचा यामध्ये समावेश आहे. एकाच दिवशी दोन कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे.

क्लिक करा- कुणी केले पहा लॉकडाउननंतर पहिले आंदोलन, वाचा काय होते कारण...

अकोल्यात चालू होते ये-जा
आढळून आलेल्या या दोन रुग्णांमुळे शहरातील कोरोना बाधितांची संख्या आठ पर्यंत पोहचली आहे. तर तालुक्यासह ही संख्या 11 वर गेली आहे. मंगळवारी (ता. 9) रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित शिक्षकाला सर्दी, ताप, खोकला असे लक्षणे आढळून आल्याने शनिवारी (ता.6) रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घशातील स्त्रावाचे नमुने घेतले असता मंगळवारी त्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचे अकोला येथे येणे-जाणे होते. सण-उत्सवाच्या निमित्ताने तो बाधितांच्या संपर्कात आला असावा, व अकोल्यातच त्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असावा, असे प्रशासनाने सांगितले आहे.

हेही वाचा- डॉ. मीनाक्षी गजभिये अकोल्याच्या नव्या ‘डीन’

आतापर्यंत दोघांचा झाला मृत्यू
दुसऱ्या रुग्णाला रविवारी (ता. 7) रोजी सर्वोपचारमध्ये दाखल करण्यात आले होते. हा रुग्ण खतीब कॉलनी परिसरातील असून, त्याचा केळे विक्रीचा व्यवसाय असल्याचे बोलले जात आहे. बाधित रुग्ण आढळून आलेल्या दोन्ही भागात प्रशासनाने कटेन्मेंट झोन तयार केले आहे. त्यामुळे नगरपरिषद क्षेत्रात नव्याने कागदीपुरा व खतीब कॉलनी या परीसरांची प्रतिबंधित क्षेत्रात भर पडली आहे. उपविभागीय अधिकारी रमेश पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना हाडोळे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गोपीचंद पवार, ठाणेदार नितीन शिंदे यांनी कागदीपुरा येथे धाव घेतली. नवीन रुग्ण सापडलेला परिसर सील करण्याची कारवाई नगरपरिषद प्रशासनाने केली आहे. या भागात औषध फवारणीसह वैद्यकीय विभागाच्या आरोग्य पथकांमार्फत येथील नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा वैद्यकीय विभागाकडून शोध घेतला जात आहे.

तालुक्याची हॉटस्‍पॉटकडे वाटचाल
तालुक्यातील वाडेगाव, अंत्री (मलकापूर) येथे तीन तर बाळापूर शहरात आतापर्यंत आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या 11 वर पोचली असून, जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत बाळापूर तालुक्याची वाटचाल कोरोना व्हॉटस्पॉटकडे सुरू झाली आहे. यापूर्वी देखील काही रुग्णांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.

37 संशयीत क्वारंटाईन
मंगळवारी सकाळच्या अहवालात एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्याच्या कुटुंबातील पाच जणांना शेळद येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर संपर्कात आलेल्या इतर 32 जणांना होम क्वारंटाईनचे आदेश देण्यात आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Two corona were found infected in Balapur on the same day