अरे बापरे! शेतातील धुऱ्याचा वाद पेटला; एकाने उचलली कुऱ्हाड तर दुसऱ्याने चालवली चक्क पिस्तुल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

तालुक्यातील घुस्सर खुर्द येथील अभिमान काशीराम मुके (वय ५५) यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली की, त्यांची भाडगणी शिवारात शेती आहे.

मोताळा (जि.बुलडाणा) : शेतातील धुऱ्याच्या वादातून दोन गटात वाद होऊन एकाने पिस्तुल चालवली तर दुसऱ्या गटाने कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली. यात दोन जण जखमी झाले आहे. सदर घटना सोमवारी (ता.८) सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास भाडगणी शिवारात घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यातील घुस्सर खुर्द येथील अभिमान काशीराम मुके (वय ५५) यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली की, त्यांची भाडगणी शिवारात शेती आहे. अभिमान मुके हे मुलासह सोमवारी (ता.८) सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास शेतात असताना, त्यांच्या शेजारी शेती असलेला गौरव समाधान मुके (२७) हा त्याठिकाणी आला. दरम्यान, अभिमान मुके यांनी त्यांच्या धुऱ्यावरील ठिबकच्या पाईपबद्दल गौरव मुके यास हटकले असता, त्याने शिवीगाळ केली. फिर्यादीच्या मुलाने त्यास जाब विचारला असता, गौरव मुके याने खिशातील पिस्तुल (छर्रा) काढून दोघा बापलेकांना जीवे मारण्याची धमकी दिली. 

हेही वाचा - अरेरे काय ही हलगर्जी! क्वारंटाईन सेंटर बाहेरच घडत आहे असा प्रकार...वाचून व्हाल थक्क

दरम्यान, फिर्यादीचा मुलगा व गौरव मुके यांच्यात लोटपाट झाली. यावेळी अभिमान मुके मधात गेले असता, आरोपी गौरव मुके याने त्यांच्या अंगावर पिस्तुलची गोळी (छर्रा) झाडली. सदर छर्रा गोळी अभिमान मुके यांच्या कपाळावर लागल्याने ते जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी उपरोक्त तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी गौरव समाधान मुके याच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार गरुड यांच्या मार्गदर्शनात एपीआय राहुल जंजाळ, पोकाँ मंगेश पाटील करीत आहेत. 

तर, दुसऱ्या गटातील गौरव समाधान मुके यांनी पोलिसांत तक्रार दिली की, त्यांची व गावातीलच अभिमान काशीराम मुके (वय ५५), धीरज उर्फ रामेश्वर अभिमान मुके (वय २६), अनंता प्रल्हाद मुके यांची शेती शेजारी-शेजारी आहे. त्यांच्यात बऱ्याच दिवसांपासून शेताच्या धुऱ्यावरून वाद सुरू आहे. गौरव मुके यांनी रविवारी सकाळी शेतातील धुऱ्याला लागून ठिबकचे पाईप टाकले असता, अभिमान मुके याने सदर पाईप मधात असल्याने काढून टाकण्याचे सांगितले. गौरव मुके यांनी पाईप मधात नाही, तुम्हीच धुरा कोरला आहे असे सांगितले. 

दरम्यान, सोमवारी सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास गौरव मुके शेतात गेला असता, उपरोक्त तिघे जण हातात लाकडी दांड्याची कुऱ्हाड घेऊन धुऱ्यावर हजर होते. त्यांनी गौरव मुके यांच्यासोबत वाद घालून कुऱ्हाडीच्या दांड्याने डोक्यात व हातापायावर मारहाण करून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी उपरोक्त तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी अभिमान काशीराम मुके, धीरज उर्फ रामेश्वर अभिमान मुके, अनंता प्रल्हाद मुके या तिघांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार गरुड यांच्या मार्गदर्शनात पोहेकाँ भगवान पारधी, पोकाँ गणेश बरडे करीत आहेत.

पोलिसांनी पिस्तुल जप्त केली
सदर प्रकरणाची माहिती मिळताच ठाणेदार गरुड यांच्या मार्गदर्शनात एपीआय राहुल जंजाळ, पोकाँ मंगेश पाटील, पोकाँ ज्ञानेश्वर धामोडे, चालक शेख मुस्तकीम व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली पिस्तुल (छर्रा) जप्त केली आहे. दोघा जखमींवर बुलडाणा येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The pistol fired from a field dispute in buldana district akola marathi news