Video : अरे वाह! पारंपरिक शेतीकडून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रयोगशिलतेकडे कल; या पिकांची लागवड

farmer in buldana.jpg
farmer in buldana.jpg

बुलडाणा : पारंपरिक शेतीकडून मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी आता प्रयोगशील पिकांकडे वळू लागला आहे. या हंगामात सुमारे पाचशे हेक्टर जमिनीवर शेतकऱ्यांनी अद्रक व हळद या मसाला वर्गीय पिकांची लागवड केली आहे.

जिल्ह्यात सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर कपाशीचे उत्पादन केले जायचे. खामगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा हे तालुके कपाशीसाठी अत्यंत पोषक होते. कपाशीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होत होते. मात्र कपाशीचा लागवड खर्च त्याची निगा राखण्याचा खर्च व इतर बाबींमुळे कपाशी कडून जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन या नगदी पिकाकडे वळला होता. आजही जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर सोयाबीनची लागवड केली जाते.

कमी अधिक पाऊस असला तरी सोयाबीन हमखास उत्पन्न देते. म्हणून शेतकरी या पिकाकडे वळला. आजमितिला सोयाबीन, तूर, हरभरा, गहू, मका, आदी पिके प्रामुख्याने घेतली जातात. गेल्या दोन-तीन वर्षात ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे, असे शेतकरी अद्रक व हळद मसाला वर्गीय पिकाकडे वळू लागले आहेत. या वर्षी या प्रमाणामध्ये निश्चितच वाढ झाली आहे. 

जिल्ह्यातील सुमारे 500 हेक्‍टरवर शेतकऱ्यांनी अद्रक व हळदीच्या पिकाची लागवड केली आहे. साधारणपणे मे महिन्याच्या तिसऱ्या ते चौथ्या आठवड्यात अद्रक व हळदीची लागवड केली जाते. दहा ते अकरा महिने कालावधी असलेल्या या पिकातून चांगले उत्पन्न घेण्याचा अनुभव अनेक शेतकऱ्यांच्या गाठीशी असल्याने सर्वसामान्य शेतकरीही या पिकांकडे वळत असल्याचे आशादायक चित्र जिल्ह्यात दिसत आहे. 

आवश्यकता पाहून पीक पॅटर्न बदलणे ही काळाची गरज
सोयाबीन, तूर , मका या पिकांच्या लागवडी पेक्षा अद्रक हळदीच्या लागवडीला खर्च जास्त येत असला तरी त्यातून उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकांना पसंती द्यायला सुरुवात केली आहे. प्रयोगशीलता ही सकारात्मक बाब जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच प्रयोगशीलतेकडे वळून मसाला वर्गीय हळद व अद्रक पिकाची लागवड करतात. ही निश्चितच चांगली बाब आहे. योग्य ती काळजी घेऊन व तांत्रिक मार्गदर्शन घेऊन शेतकऱ्यांनी या पिकांपासून अधिकाधिक उत्पादन घेतले पाहिजे. बाजाराची आवश्यकता पाहून पीक पॅटर्न बदलणे ही काळाची गरज आहे.
- नरेंद्र नाईक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलडाणा. 

उत्पादनापासून शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतात
जास्त पैसा देणारी पिके अद्रक व हळद या लागवडीकडे शेतकरी वळण्याचे कारण म्हणजे या पिकांच्या उत्पादनापासून शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतात. शिवाय या दोन्ही पिकांना जनावरांचा किंवा इतर कुणाचाही धोका नाही. विशेषतः हळदीचे उत्पादन हे हमखास फायदा देणारे आहे. एखादेवेळी भाव नसला तरी त्याची साठवणूक करून आपण बाजाराच्या तेजी-मंदी नुसार त्याची विक्री करू शकतो. 
- नंदकिशोर ठेंग, हळद उत्पादक, शेतकरी बुलडाणा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com