धक्कादायक माहिती, आजार लपविल्यास फुफ्फुसच होऊ शकते निकामी!

मनोज भिवगडे 
Friday, 14 August 2020

कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर आजारपण लपविल्यास फुफ्फूसच निकामी होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अकोला जिल्ह्यात मृत्यू झालेल्या रुग्णांच्या तपासणीतून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.त्यामुळे लक्षणे दिसताच शासकीय रुग्णालयात दाखल करावे, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातर्फे करण्यात आले.

अकोला  ः कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर आजारपण लपविल्यास फुफ्फूसच निकामी होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अकोला जिल्ह्यात मृत्यू झालेल्या रुग्णांच्या तपासणीतून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.त्यामुळे लक्षणे दिसताच शासकीय रुग्णालयात दाखल करावे, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातर्फे करण्यात आले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविड-१९ मृत्यू परीक्षणबाबतची शासकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक सोमवार (ता.१०) रोजी संपन्न झाली.

या बैठकीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, डॉ. कुसमाकर घोरपडे, डॉ. श्यामकुमार सिरसाम, डॉ. प्रदीप उमप, डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, डॉ. अनिल बत्रा, डॉ. संजय वाघ व डॉ. दिलीप सराटे उपस्थिती होती. ता. ३१ जुलै ते १० ऑगस्ट या कालावधीतील कोविड रुग्णांचा झालेल्या मृत्यूच्या वैद्यकीय कारणांचा आढावा घेण्यात आला.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

यावेळी देण्यात आलेल्या माहितीनुसार, या कालावधित १४ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात १२ पुरुष व दोन महिलाचा समावेश आहे. त्यापैकी पाच रुग्ण उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात झाले होते.

१० रुग्णांना अगोदरच कोविड व्यतिरिक्त इतर आजार जसे मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा मुत्रपिंडाचे आजार असल्याचे निर्दशनास आले तर नऊ रुग्ण हे ६० वर्षावरील होते. रुग्णांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यावेळी या सर्वांना एचआरसीटी वर फुफ्फुसाचे पाच ते सहा लोब खराब झाल्याचे दिसून आले. त्याच प्रमाणे शरीरातील मुत्रपिंड व स्वादूपिंड या सारखे अवयव योग्य पद्धतीने कार्य करीत नसल्याचे आढळले.

अशा अवस्थेमध्ये रुग्ण औषधोपचारास योग्य प्रतिसाद देऊ शकत नाही. यावेळी फुफ्फुस व इतर अवयव बऱ्याच अंशी निकामी झाल्याने रुग्णाची अवस्था अत्यंत गंभीर झालेली असते. १४ पैकी पाच रुग्ण लक्षणे सुरू झाल्यांनतरही घरी किवा स्थानिक वैद्यकीय व्यवसायिकांकडून उपचार घेत राहिले.

यांचा कालावधी हा ५ दिवसांपेक्षा जास्त होता. रुग्णालयात दाखल होण्याकरिता झालेल्या विलंबामुळे या रुग्णांमध्ये कोविड-१९ हा आजार बळावला होता व महत्त्वाच्या अवयवांवर याचा गंभीर परिणाम झाला होता. शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होऊन मृत्यू झाला.
 
घरी वेळ घालवू नका!
कोविड रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी सूचविण्यात आलेल्या उपाययोजनांनुसार लक्षणे दिसून येताच घरी वेळ न घालवता रुग्णाने तत्काळ घशातील स्त्रावाची तपासणीसाठी रुग्णालयात दाखल होणे आवश्यक आहे. तसे झाल्यास मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल. दोन रुग्णांनी खासगी दवाखान्यात औषधोपचार घेतला होता. नंतर श्वसनक्रिया खालावली असताना सर्वोपचार रुग्णालयामध्ये धाव घेतली होती. तोपर्यंत त्यांचे फुफ्फुस निकामी झाले होते. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी रुग्णामध्ये कोविड लक्षणे आढळताच संबंधित रुग्णाबाबत महानगरपालिकेस सूचना द्यावित, जेणेकरून रुग्ण गंभीर न होता लगेच शासकीय रुग्णालयात दाखल होईल व पुढील योग्य पद्धतीने उपचार सुरू होतील व मृत्यूदर कमी होईल, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:  Akola News If the disease is hidden, only the lungs can be useless!