१०८ रुग्णवाहिका, निवासी डॉक्टरविना आरोग्य व्यवस्था ढेपाळली

कोविड लसींचा अनियमित पुरवठा; अनेक पदे रिक्त
१०८ रुग्णवाहिका, निवासी डॉक्टरविना आरोग्य व्यवस्था ढेपाळली

हिवरखेड (जि.अकोला) ः ४० हजार लोकसंख्या असलेले गावात आरोग्य सुविधांचा अभाव असल्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत काही विचारना केली असता, स्थानिक लोकप्रतिनिधी मुजोरीची भाषा वापरून सामान्य नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सोमवारी (ता.१९) पार पडलेल्या लोकप्रतिनिधी, पोलिस कर्मचारी, आरोग्य विभाग, व्यापारी संघटना, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पत्रकारांच्या उपस्थितीत बैठकीत दिसून आले.

सोमवारी (ता.१९) कोविड संदर्भात उपाययोजना, नियोजन आणि महत्त्वाच्या चर्चेसाठी अकोट उपविभागीय अधिकारी देशपांडे, तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर, सहाय्यक गटविकास अधिकारी लिंबाजी बारगिरे, विस्तार अधिकारी सतीश सरोदे, सरपंच सीमा राऊत, उपसरपंच रमेश दुतोंडे, पोलिस उपनिरीक्षक गोपाल दातीर, अनेक लोकप्रतिनिधी-पदाधिकारी यांची हिवरखेडचे व्यापारी आणि पत्रकार बांधवांसोबत बैठक पार पडली. हिवरखेड सह परिसरातील गावातील जवळपास एक लाख नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर असल्यामुळे येथे कमीत-कमी दोन १०८ रुग्णवाहिकांची नितांत गरज आहे. याउलट येथे असलेली १०८ रुग्णवाहिका सुद्धा कोविड साठी अकोल्याला पळविल्या गेली.

त्यामुळे १०८ रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसल्याने, आतापर्यंत अनेक रुग्णांना जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी उदाहरणे आहेत. येथे मंजूर पदांपैकी अनेक पदे रिक्त असून, रात्री मुक्कामी निवासी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांना वणवण भटकावे लागते. शासनाने लक्षावधी रुपये खर्चून बांधलेले वैद्यकीय अधिकारी निवास शोभेची वस्तू बनले आहे. येथील आरोग्य केंद्रात रिक्त पदांची यादी लांब आहे.

परंतु, विविध फलकांवर मान्यवरांच्या नावाची भरमार आहे. एकूण नावे व पदांचे चार फलक लावले असून, त्यावर जवळपास ८३ नावे व पदाची नोंद आहे, पण संबंधित मान्यवरांचे, लोकप्रतिनिधींचे, अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, मोबाईल नंबर कोठेही लिहिलेली नाहीत. इतकी नावे असताना त्यातील काहींचे जरी संपर्क क्रमांक नमूद केलेले असले, तर रुग्णांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत होईल, आणि आपत्कालीन परिस्थितीत गंभीर रुग्णांचे जीव वाचवता येतील अशी रास्त समस्या महत्त्वाच्या बैठकीत मांडणाऱ्या जागरूक पत्रकाराला एका लोकप्रतिनिधीने मुजोरी करीत, मोठ्याने जोराच्या आवाजात दबावतंत्राचा वापर करून अरेरावीच्या शब्दात धमकवण्याचा आणि सामान्य जनतेच्या आवाज दाबण्याचा प्रकार ग्रामपंचायतमध्ये झालेल्या बैठकीत घडला.

--------------------------------

कैद्यांसोबत पोलिसांची भटकंती

स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये काही पीडित किंवा आरोपींना वैद्यकीय चाचणीसाठी येथील आरोग्य केंद्रात यावे लागते. परंतु, आरोग्य केंद्रात एमबीबीएस दर्जाचे डॉक्टर उपलब्ध नसल्याने पोलिसांना आरोपी व पीडितांना सोबत घेऊन अकोट, तेल्हारा, अडगाव इत्यादी ठिकाणी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र अनेक वेळा पाहवयास मिळते.

------------------------------

हिवरखेड येथील आरोग्यविषयक मागण्यांसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. सोबतच कोविड रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.

-श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी, अकोट.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com