esakal | दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीचे काय?
sakal

बोलून बातमी शोधा

दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीचे काय?

दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीचे काय?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना विषाणू कोविड-१९ मुळे २०२०-२१ या शैक्षणिक सत्रातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय एप्रिल २०२१ मध्ये घेण्यात आला. मात्र, बारावीच्या परीक्षेबाबत अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने हे विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. शिवाय दहावीच्या १७ लाख विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्यात आल्याने पुढे त्यांच्या प्रवेशाचा प्रश्नही गंभीर होणार आहे. दहावीनंतर प्रवेशासाठी केवळ नऊ लाख विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्याची व्यवस्था असल्याने उर्वरित विद्यार्थ्यांचे सरकार करणार काय, असा प्रश्न शिक्षण तज्ज्ञ तथा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विद्वत परिषद सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी उपस्थित केला आहे.

सरकारने कोविड विषाणू संसर्गाची परिस्थिती बघून दहावीची परीक्षा एप्रिल महिन्याच्या शेवटी रद्द करण्याचा निर्णय घेतला. बारावी बद्दल अद्याप काहीही निर्णय नाही. त्यामुळे बारावीतील विद्यार्थी परीक्षा होणार किंवा नाही या संभ्रमात आहे. सोबतच दहावीत सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाली आहेत. त्याचे सरकारने अद्यापही पर्याय शोधलेले नाही.

जवळपास राज्यातील १७ लाख विद्यार्थी अकरावी, पॉलिटेकनिक, आयटीआय इत्यादीसाठी पात्र झालेत. राज्यात जास्तीत जास्त नऊ लाख विद्यार्थ्यांना पुढील वर्गात समावेश करण्याची क्षमता शिक्षण संस्थांची आहे. उरलेल्या आठ लाख विद्यार्थ्याच्या प्रवेशाचे काय? त्यांचे पुढील वर्गातील प्रवेश कसे होतील? सर्वच विद्यार्थ्यांना पास केल्याने त्यांना किती गुण प्राप्त झाले, हे सांगूच शकत नाही. तर मग कशाच्या आधारावर त्यांना प्रवेश दिले जाणार आहे? कला, वाणिज्य व विज्ञान या शाखेतील प्रवेश कशाच्या आधारावर देण्यात येईल? याचा निर्णयनंतर जाहीर केला जाईल असे सांगितले आहे.

मग परीक्षा रद्द करून काय साध्य झाले? विद्यार्थ्यांचे व त्यांचा पालकांचे दडपण त्याने कमी न होता, अजूनच वाढले. आता पुढील वर्गात प्रवेश कसा व कशाच्या आधारावर मिळेल याची चिंता त्यांच्या समोर आ वासून उभी ठाकली आहे. दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयासोबतच पुढील वर्गातील प्रवेशासाठीची कार्यप्रणाली जाहीर करणे संयुक्तिक ठरले नसते का? आता मूल्यांकनाशिवाय दहावीतील सर्वांना पास केल्याने होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या महाविद्यालयात, आवडत्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळेल की नाही याबद्दल शंका निर्माण होऊ लागल्या आहेत.

त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांप्रमाणे, ऑनलाइन पध्दतीने, बहुपर्यायी निवड प्रश्न पध्दतीने (एमसीक्यू) अकरावी, पाॅलिटेकनिक किंवा आयटीआय इत्यादीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रवेश परीक्षा घ्याव्यात व तसा निर्णय लवकर घेतल्यास विद्यार्थ्यांचे व त्यांचा पालकांचे प्रवेशासाठीचे दडपण कमी होईल, असे डाॅ. संजय खडक्कार यांनी सांगितले.

संपादन - विवेक मेतकर

loading image