Akola News : जिल्ह्यातील १२ हजार शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची आस! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

12 thousand farmers hope for government help crop damage compensation Heavy rains akola

Akola News : जिल्ह्यातील १२ हजार शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची आस!

अकाेला : जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टाेबर २०२२ मध्ये अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीची मदतीसाठी ५५ काेटी ४४ लाख रुपये मंजूर झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात ११ हजार ९६२ शेतकऱ्यांची माहिती शासनाला सादर करण्यात आली असून, त्यांना मदत देण्यासाठी सात काेटी सात लाखाची गरज भासणार आहे.

नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात थेट शासनस्तरावरून जमा हाेणार आहे. ही प्रक्रिया किचकट असल्याने मदत मिळण्यासाठी विलंब हाेत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सन २०२२ च्या खरीप हंगामातील नुकसानाची मदत सन २०२३ च्या खरीप हंगाम संपण्यापूर्वी तरी मिळेल काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

सन २०२२ च्या खरीप हंगामातील जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे चारही महिने भरपूर प्रमाणात पाऊस झाला. त्यानंतर ऑक्टाेबरमध्ये परतीच्या पावसानेही जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. परिणामी शेतमालाचे उत्पादन प्रचंड घटले.

सप्टेंबर व ऑक्टाेबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाच्या स्तरावरून करण्यात आले. या पंचनाम्यांच्या आधारावर जिल्हा प्रशसानाने विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे निधीची मागणी केली आहे. त्यानुसार मदत मंजूर झाली आहे.

दोन महिन्यात असे झाले होते नुकसान

खरीपातील सप्टेंबर२०२२ मध्ये पहिल्या टप्प्यात तेल्हारा व मूर्तिजापूर तालुक्यातील १० हजार २४५ शेतकऱ्यांच्या सात हजार ७३४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली हाेती. नुकसान भरपाईसाठी १० काेटी ८७ लाखाची मागणी करण्यात आली.

दुसऱ्या टप्प्यात तेल्हारा तालुक्यातील सात हजार ७६१ शेतकऱ्यांच्या पाच हजार ८५४ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान भरपाईसाठी सात काेटी सात लाखाची मागणी करण्यात आली आहे. त्यासोबत ऑक्टाेबरमध्ये पहिल्या टप्प्यात अकाेट, तेल्हारा व बाळापूर तालुक्यातील पाच हजार ३२२ शेतकऱ्यांचे तीन हजार २७२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेे. यासाठी साह काेटी दोन लाखांची मागणी करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात आता अकाेट व तेल्हारा तालुक्यातील चार हजार २०१ शेतकऱ्यांच्या तीन हजार ८६ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान भरपाईसाठी पाच काेटी ८६ लाखाच्या अनुदानाची मागणी करण्यात आली आहे.

निधी वितरणाची नवी पद्धत

पीक नुकसाची मदत यापूर्वी शासनाकडून जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातून तालुक्यांना मदतची रक्कम वितरीत करून ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा हाेत हाेती. आता ऑनलाईन पद्धतीने मदत दिली जाणार आहे. मदतीसाठी पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. यासाठी तहसीलदारांना देश देण्यात आले आहे. ही माहिती शासनाला सादर हाेऊन शासनस्तरावरून मदतची रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा हाेणार आहे.