esakal | 29 बॅँकांनी वितरीत केले पिककर्जाचे 308 कोटी रुपये

बोलून बातमी शोधा

 29 बॅँकांनी वितरीत केले पिककर्जाचे 308 कोटी रुपये
29 बॅँकांनी वितरीत केले पिककर्जाचे 308 कोटी रुपये
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
  • २९ बँकांद्वारे ३०८.८६ कोटी वितरीत

  • पीककर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर

अकोला ः खरिपासाठी जिल्ह्यातील २९ बँकांनी आतापर्यंत उद्दीष्टाच्या २७ टक्के पीककर्ज वाटप केले आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर असून, उद्दीष्टाच्या ५० टक्के पीककर्ज जिल्हा बँकेने खातेदार शेतकऱ्यांना वाटप केले आहे.

दरवर्षी पीककर्ज मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना बँकांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. हजारो शेतकरी कोणत्या ना कोणत्या कारणाने दरवर्षी पीककर्ज मिळण्यापासून वंचित राहतात. त्यामध्ये प्रामुख्याने थकबाकीदार म्हणून बँकांद्वारे शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारले जाते. यावर्षी मात्र, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये पात्र ठरल्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांचा आकडा अल्प व पीककर्जासाठी पात्र शेतकऱ्यांचा आकडा अधिक आहे. त्यामुळे यावर्षी जास्तीत जास्त शेकऱ्यांना पीककर्ज मिळविता येऊ शकेल. खरिपाला अजून दीड महिन्याचा कालावधी बाकी असून, बँकांद्वारे पीककर्ज वितरण सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २९ बँकांद्वारे ३३ हजार १४१ खातेदार शेतकऱ्यांना ३०८.८६ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरीत करण्यात आले आहे. त्यापैकी खासगी व राष्ट्रीयकृत अशा २७ बँकांनी १४६४ शेतकऱ्यांना १३.८९ कोटी, ग्रामीण बँकेद्वारे २०५४ खातेदार शेतकऱ्यांना २०.५२ कोटी तर, सर्वाधिक जिल्हा बँकेद्वारे २९ हजार ६२३ खातेदार शेतकऱ्यांना २७४.४५ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरीत करण्यात आले आहे.

गेल्यावर्षी एवढेच म्हणजे दीड लाख खातेदार शेतकऱ्यांना १२०० कोटी रुपयांचे पीककर्ज वितरणाचे जिल्ह्यातील २९ बँकांना उद्दीष्ट आहे. आतापर्यंत उद्दीष्टाच्या २७ टक्के म्हणजे ३३ हजार १४१ खातेदार शेतकऱ्यांना ३०८.८६ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरीत करण्यात आले आहे.

- आलोक तारेणीया, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, अकोला

......................

ज्यांनी ३१ मार्चपर्यंत पैसे भरले त्यांना प्राधान्याने आम्ही पीककर्ज वितरीत करीत आहोत. २७ एप्रिलपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारे जिल्ह्यात ३०७ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. पीककर्ज वाटप करताना डिजीटल सातबारा सुद्धा स्वीकारला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज मिळविताना अडचण आल्याची कोठेही तक्रार नाही.

- अनंत वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अकोला

संपादन - विवेक मेतकर