esakal | पावसाच्या प्रतीक्षेत अकोलेकरांना अजूनही उन्हाचे चटके; पारा 35.7 अंशावर
sakal

बोलून बातमी शोधा

temperature.jpg

एरव्ही मेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी लागते आणि उन्हाचा जोर कमी होत जातो.

पावसाच्या प्रतीक्षेत अकोलेकरांना अजूनही उन्हाचे चटके; पारा 35.7 अंशावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : मृगाच्या प्रारंभापासून म्हणजेच ७ जूनपासून पावसाळा सुरू झाला. मात्र पावसाच्या प्रतीक्षेत अकोलेकरांना अजूनही उन्हाचे चटके अनुभवावे लागत असून, रविवारी (ता.२८) सुद्धा रवि तापल्याने, कमाल ३५. ७ अंश सेल्सिअसची नोंद अकोल्यात झाली.

एरव्ही मेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी लागते आणि उन्हाचा जोर कमी होत जातो. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून म्हणजेच मॉन्सूनच्या आगमनानंतर मात्र पावसाचा जोर वाढतो आणि कमाल तापमानात घट होत असते. परंतु, यावर्षी जून संपत आला असूनही अकोलेकरांना मॉन्सूनच्या जोरदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत असून, अपेक्षाच्या विपरीत उष्णतेमध्ये वाढ होतानाचा अनुभव येत आहे. यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यातच जोरदार मॉन्सूनचे आगमन होणार असून, शेतीसाठी पोषक पाऊस पडणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले होते. 

मात्र मध्यंतरी ॲम्फन व निसर्ग या दोन वादळाच्या निर्मितीने मॉन्सूनचा प्रवास लांबला. राज्यातील स्थानिक हवामानातही बदल झाल्याने आर्द्रतेचा टक्का कमी जास्त होत असून, शेतकऱ्यांना अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र तापमानाचा जोर वाढल्याने रविवारी अकोल्यात कमाल तापमान ३५.७ अंशावर पोहचले असून, गर्मीचाही त्रास नागरिकांना सोसावा लागला.

दोन ते तीन दिवसाचा अवधी अपेक्षित
मॉन्सून पूर्ववत होण्याकरिता आणखी दोन ते तीन दिवसाचा अवधी अपेक्षित आहे. कमी झालेली हवेतील आर्द्रता आणि वाढत असलेले तापमान चिंतेत भर घालत आहे. देशात मॉन्सून उत्तर छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडीसामध्ये सक्रिय असल्याचे दिसत असून, पूर्व विदर्भात मेळघाट पासून गोंदियापर्यंत मुख्यतः मध्यप्रदेश सीमेलगतच्या तालुक्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. उत्तर बुलडाणा (संग्रामपूर/जळगाव जामोद), उत्तर अमरावती, उत्तर अकोला (अकोट/तेल्हारा) या तालुक्यात गडगडाट सह पावसाची शक्यता आहे.
- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर