esakal | परस बागेत फुलविली ५४ प्रकारची फळ-फुल झाडं!
sakal

बोलून बातमी शोधा

परस बागेत फुलविली ५४ प्रकारची फळ-फुल झाडं!

परस बागेत फुलविली ५४ प्रकारची फळ-फुल झाडं!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेत अकोला येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांच्या पत्नी स्नेहल चौधरी-कदम यांनी ते राहत असलेल्या शासकीय निवास स्थानीच परस बाग फुलविली आहे. माझी वसुंधरा अभियानात त्यांनी वृक्षरोपण, संवर्धन करून दिलेले योगदान कौतुकास्पद आहे.

मुळच्या वाशीम जिल्ह्यातील रहिवासी व ‘क्षितिज’ या सामाजिक संस्थेच्या संस्थापक स्नेहल चौधरी यांचे पती सचिन कदम हे अकोला येथे उपविभागीय पोलिस अधिकारी आहेत. पर्यावरण संरक्षणाचे धडे त्यांना आई पुष्पा ज्ञानेश्वर चौधरी यांच्या कडून मिळाले. आईला कुंड्यांमध्ये रोपांची लागवड करताना व ती जोपासताना बघून प्रेरणा मिळाली आहे. याबाबत बोलताना स्नेहलताईंनी म्हणाल्या की, माझे पती सचिन कदम यांची बदली अकोला येथे पोलिस उपअधीक्षक म्हणून झाली.

आम्हाला येथे पोलिस शासकीय निवासस्थान मिळाले. त्या ठिकाणी जागा पण पुरेशा प्रमाणात आहे. येथे आम्ही भाजीपाला फळे, फुले, औषधी वनस्पती सेंद्रीय पद्धतीने वाढवायचे ठरवले. आधीच्या अधिकाऱ्यांनी लावलेली पण बरीच झाडे या ठिकाणी होती. त्यांची जपणूक करण्यापासून सुरुवात केली. आळे करणे, कटिंग करणे, गरज आहे तेवढे पाणी देणे याकडे आम्ही दररोज काही वेळ देऊन लक्ष देतो. सचिन सरांनी आधी सर्व परिसर स्वच्छ करून घेतला, कुंपण केले. नंतर आम्ही सेंद्रिय शेतीला लागणारी बेसिक तयारी केली. आम्ही दोघेही आवर्जून भाजीपाला तसेच एक-एक झाड चेक करतो.

अधून-मधून तज्ञांचा सल्ला घेतो. अनेक लोक आम्हाला म्हणतात की बदली झाले की सोडून तर जायचं आहे; मग कशाला एवढी मेहनत आणि वेळ वाया घालवता? पण आम्ही आमच्या ध्येयावर ठाम आहोत. बियाणे विकत न आणता घरी जे काही उपलब्ध आहे किंवा होते तेच वापरले. घरीच तयार झालेल्या बिया परत-परत लावत आहोत. सुशोभीकरण म्हणून गार्डनमध्ये लाकडावर पेंटिंग सुद्धा मी केले आहे, असे त्यांनी सांगितले. पक्ष्यांसाठी निवारा, अन्न, पाण्याची व्यवस्था केलेली आहे.

कोबीपासून कडीपत्त्यापर्यंत सर्वंच झाडं परस बागेत

कदम दाम्पत्याने परस बागेत फुल कोबी, ब्रोकोली, टोमॅटो, पालक, मेथी, कोथिंबीर, शेपू, चवळी, पुदिना, अद्रक, कांदा, लसून, लिंबू, काकडी, बीट, करवंद, भेंडी, गवार, वांगी, मटकी, मुळा, कडीपत्ता या भाजीपाल्याचा सीताफळ, मोसंबी, चिकू, आवळा, बदाम, या फळांचा तसेच गवती चहा, तुळस, बेल, गुलाब, चाफा, मोगरा, सायली, जास्वंद, स्वस्तिक या औषधी वनस्पतींची लागवड करून त्याचे संगोपन केले आहे. त्यांच्या परस बागेची सध्या ५४ प्रकारची फळ, भाज्या, फुले व औषधी वनस्पती शोभा वाढवित आहेत.

पर्यावरण संरक्षणाची आवड- सचिन कदम

माझी पत्नी क्षितीज संस्थेची संस्थापिका स्नेहल हिला पर्यावरण संरक्षणाची आवड आहे. पर्यावरण संरक्षणासाठी नेहमी स्नेहल काही ना काही उपक्रम राबित असते. मला जेव्हापण वेळ मिळतो तेव्हा मी परस बागेत पत्नीसोबत झाडांची निगा राखतो. त्यामुळे परिसरात नेहमी आल्हादायक वातवरण राहते, व वेळही खूप छान जातो, असे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांनी सांगितले.

तुळशीचे रोप दान करणार

सध्या कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्त्व लोकांना कळले आहे. भरपूर प्रमाणात वातावरणात ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या तुळशीचे रोपे तयार करून ती दान करण्याचा उद्देश कदम दाम्पत्याचा आहे. जी आहेत ती फळे, पालेभाज्या इत्यादी जोपासणे, त्यामध्ये वाढ करत राहणे व आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांनासुद्धा त्यासाठी प्रेरीत करण्याचा प्रयत्न सचिन व स्नेहल कदम करीत आहेत.

संपादन - विवेक मेतकर

loading image