esakal | तौक्ते वादळग्रस्तांसाठी ५७.१६ लाखाची मदत
sakal

बोलून बातमी शोधा

money

तौक्ते वादळग्रस्तांसाठी ५७.१६ लाखाची मदत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः मे महिन्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील शेती पिकांसह घरांचे नुकसान झाले होते. संबंधित नुकसानग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला ५७ लाख १६ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. सदर निधी अकोला, अकोट, तेल्हारा व बार्शीटाकळी तालुक्यातील तहसीलदरांना वर्ग करण्यात आला असून लवकरच त्याचे वाटप करण्यात येईल. (57.16 lakh assistance for storm victims)मे महिन्याच्या मध्यावधीत अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने अतिरौद्र रूप धारण केले होते. या चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्रासह गोवा, केरळ आदी भागाला जोरदार तडाखा बसला होता. अकोला जिल्ह्यात सुद्धा तौक्ते चक्रीवादळामुळे वेगवान वाऱ्यासह बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे शेतातील फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे प्रशासनामार्फत नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्यात आले होते. सदर पंचनाम्यांचा अहवाल शासनाकडे पाठवल्यानंतर सुद्धा नुकसानग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा होती. दरम्यान आता शासनाकडून जिल्हा प्रशासनाला तौक्ते चक्रीवादळग्रस्तांसाठी मदत निधी प्राप्त झाला आहे. सदर निधीचे वाटप नुकसानग्रस्तांंना करण्यासाठी संबंधित तहसीलदारांच्या खात्यात ५७ लाख १६ हजार रुपयांचा निधी वळती करण्यात आला आहे. त्यामुळे तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

असे मिळणार अनुदान
- मनुष्य हानी, जखमी तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पूर्णतः क्षतीग्रस्त झाली असल्यास कपडे तसेच घरगुती भांडी यांचे नुकसान झालेल्यांना एसडीआरफच्या दराने २ लाख ५ हजार रुपये तर वाढीव दराने ४ लाख १० हजार रुपये असे एकूण ६ लाख १५ हजार रुपयांची मदत मिळणार आहे.
- पूर्णतः नष्ट, अंशतः पडझड झालेली कच्ची, पक्की घरे, नष्ट झालेल्या झोपड्या व गोठ्‍यांसाठी एसडीआरएफच्या दराने अनुदान देण्यासाठी १० लाख ३२ हजार रुपये मिळाले आहेत, तर वाढीव दराने मदतीसाठी १४ लाख ३० हजार रुपये असे एकूण २४ लाख ६२ हजार रुपये मिळाले आहेत.
- शेतीपिके व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाल्यामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी एसडीआरएफच्या दराने अनुदान देण्यासाठी ८ लाख ९६ हजार रुपये तर वाढीव दराने मदत देण्यासाठी १५ लाख ९३ हजार रुपये असे एकूण २४ लाख ९६ हजार रुपये मिळाले आहेत.
- चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या दुकानदार व टपरीधारकांसाठी १ लाख ५० हजार रुपयांची मदत मिळाली आहे.

तहसीलदारांना दिलेले अनुदान
तालुका अनुदान
अकोला ४६ लाख २६ हजार रुपये
अकोट ७५ हजार रुपये
तेल्हारा १ लाख ६५ हजार रुपये
बार्शीटाकळी ८ लाख ५० हजार रुपये
-----------------------------------
एकूण ५७ लाख १६ हजार रुपये


57.16 lakh assistance for storm victims

loading image