esakal | व्यापाऱ्याच्या घरावर भरदिवसा दरोडा, मोलकरीणच निघाली मास्टरमाईंड
sakal

बोलून बातमी शोधा

Arrest

व्यापाऱ्याच्या घरावर भरदिवसा दरोडा, मोलकरीणच निघाली मास्टरमाईंड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोट (जि. अकोला) : अकोट शहरात ३१ ऑगस्ट रोजी भरदिवसा प्रतिष्ठित व्यापारी अमृतलाल सेजपाल यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला आला होता. या घटनेच्या दोन दिवसानंतरच अकोट पोलिसांनी (akot police) सहाही आरोपींना अटक केली आहे. झटपट पैसे कमविण्याच्या नादात मोलकरणीनेच हा कट (akola crime) रचल्याचे प्रथमदर्शी पुराव्यावरून निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा: साक्षी ज्वेलर्स दरोडा आणि हत्याकांडाचा 48 तासात उलगडा

बुधवार वेस येथील अमृतलाल सेजपाल यांच्या घरात घुसून मारहाण करण्यात आली होती. घरच्या तीनही सदस्यांना दोरीने बांधून दरोडेखोरांनी एक मोबाईल व २७०० रुपये रोख रक्कम लंपास केली. या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले होते. पोलिस दलाने सतत तीन दिवस अथक परिश्रम घेत अखेर शुक्रवार, ता. ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास सहा जणांना अटक केली असून, या व्यतिरिक्त एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतले आहे. शहरातील वखारिया जीन येथील लक्ष्मी हार्डवेअर चे संचालक अमृतलाल सेजपाल हे बुधवार वेस येथे वास्तवास आहेत. सेजपाल यांच्या घरी घरकाम करणारी वैशाली विठ्ठल टवरे वय (४५ वर्ष) रा. शिवाजी नगर मोठे बारगण ही महिला अनेक अनेक वर्षपासून येथे कामाला होती. कोरोना मुळे गत दीड वर्षांपासून तिला कामावरून कमी केले होते. मात्र तिच्या सोबत सेजपाल कुटुंबाचे आपुलकीचे संबंध कायम होते.

अमृतलाल सेजपाल यांचे चिरंजीव यश्विन व सून लग्न समारंभासाठी खामगाव येथे बाहेर गावी जाणार असल्याने स्वयंपाक व इतर घरकामासाठी वैशाली टवरे हिला दोन दिवसांकरिता बोलावून घेतले. यावेळी वैशालीच्या मनात लालसा निर्माण झाली. एक दिवस घरकाम आटोपून तिने घरातील सर्व माहिती जाणून घेतली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३१ ऑगस्ट रोजी तिने आपला पती विठ्ठल नामदेव टवरे (५०), संगम गणेश ठाकरे (३२), सागर गणेश ठाकरे (३६), अमृता संगम ठाकरे (२५) रा. येवदा, हल्ली मुक्काम मुक्ताई संकुल कबुतरी मैदान अकोट, सीमा विजय निंबोकार (३६) नरसिंग कॉलनी आणि एक विधी संघर्ष बालक यांच्या मदतीने घरात घुसून सदस्यांना मारहाण करीत दोरीने बांधून ठेवले. घरातील सामानाची नासधूस सुरू केली.मात्र घरातील मुलीने खिडकीतून आरडाओरडा केल्याने या सर्वांनी एक मोबाईल व २७०० रुपये रोख घेऊन पोबारा केला.

यानंतर पोलिसांनी शोधा-शोध सुरू केली. पोलिसांनी शहरातील मुख्य बाजारपेठ व गल्लीबोळातील सर्वच सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात काहीजण एका ऑटोमध्ये गडबडीत बसताना दिसले. पोलिसांनी ऑटोची माहिती घेत ऑटोपर्यंत पोहोचले. ऑटो चालकाने पोलिसांना सहकार्य करीत त्या व्यक्तींना कुठे सोडले व इतर माहिती सांगितली. पोलिसांनी वर्णना वरून वैशाली टवरे हिला ताब्यात घेतले. तिची चौकशी केल्यानंतर तिने सर्वच घटनाक्रम कथन केला. पैशाच्या हव्यासापोटी आम्ही सर्वांनी हे कृत्य केले अशी कबुली दिली. घरातून चोरलेला मोबाइल पोलिसांनी यावेळी जप्त केला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना ता. ६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील एका विधी संघर्ष बालकाला नातेवाईकांच्या ताब्यात दिले आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांचे मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक राजेश जवरे, उमेश सोळंके, उमेश पराये, राजेश वसे, सुलतान पठाण, गोपाल अघडते ,गोपाल बुंदे, विजय चव्हाण, विजय सोळंके, दिलीप तायडे, वसीम शेख, अंकुश डोबाळे, विशाल दांदळे यांनी केली आहे.

ऑटो चालकाचे मोलाचे सहकार्य

सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये घटनास्थळावरून ऑटोमधून काही जण गेल्याचे दिसून आले. ऑटोचा नंबर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नसल्याने त्या ऑटोच्या वर्णनावरून पोलासानी त्या ऑटो चालकाला विचारले. चालकाने मोलाचे सहकार्य करून पोलिसांना गुन्हेगारांपर्यत पोहचविण्यात मदत केली.

डीबी पथकाला मिळणार बक्षीस

ता. ३१ ऑगस्ट रोजी बुधवार वेस भागात भर दुपारी व्यापारी अमृतलाल सेजपाल यांच्या घरी दरोडा पडला. दोन दिवसात डीबी पथकाने दरोडेखोरांच्या मुसक्या आवळून मोलाची कामगिरी केल्याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या कडून डीबी पथकाला बक्षीस देण्यात येणार असल्याचे ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी सांगितले.

घरची मोलकरीण निघाली मास्टरमाईंड!

दीड वर्षा पूर्वी घरचे काम करणारी मोलकरीण व तिचा पती मास्टरमाईड निघाल्याचे निष्पन्न झाले. सेजपाल कुटुंबाच्या घरी पडलेल्या दरोडा प्रकरणी दीड वर्षा पूर्वी तिथे काम करत असलेली मोलकरीणने हा सर्व प्रकार केल्याचे उघडकीस आले असून, तिला व तिच्या पतीसह एकूण सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.

loading image
go to top