esakal | ऑक्सिजन एक्स्प्रेसचा एक टँक अकोला जिल्ह्यात

बोलून बातमी शोधा

ऑक्सिजन एक्स्प्रेसचा एक टँक अकोला जिल्ह्यात

ऑक्सिजन एक्स्प्रेसचा एक टँक अकोला जिल्ह्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः देशातील विविध भागात ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑक्सिजन एक्स्प्रेसची सेवा देशाच्या विविध भागात अविरत सुरू आहे. अकोला जिल्ह्यालाही या एक्स्प्रेसमुळे काही रुग्णालयात वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकला. त्यामुळे प्रशासनाला तसेच रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

अकोला जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात कुठेही ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये या उद्देशाने विशाखापट्टणमवरून नागपूरला आलेल्या ऑक्सिजन एक्स्प्रेस मधील एक टॅंकर अमरावती आणि अकोला जिल्ह्याला विभागून देण्यात आला .

सुमारे १० मेट्रिक टन इतका ऑक्सिजनचा हा साठा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयाला सहा मेट्रिक टन आणि उर्वरित चार मेट्रिक टन साठ मूर्तिजापूर येथील शासकीय रुग्णालयाला देण्यात आला आहे. या ऑक्सिजन टँकरमुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला असून, गरजू रूग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी मोठी मदत झाल्याची प्रतिक्रिया निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.

जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज पाहता पुण्यातून सुद्धा ऑक्सिजनचे टँकर मागवण्यात येत असल्याचं खडसे यांनी सांगितले. ऑक्सिजनच्या टंचाईला दूर करण्यासाठी देशभरात चालवण्यात येत असलेल्या ऑक्सिजन एक्स्प्रेसमुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळत आहे. उपलब्ध असलेल्या विविध मार्गानी ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम केंद्र सरकारकडून सुरू आहे.

संपादन - विवेक मेतकर