महावितरणच्या अभियंत्यावर एसीबीची कारवाई; आरोपीला रंगेहात अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

चार हजार रुपयांची मागणी करणारा अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रोजी लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.

महावितरणच्या अभियंत्यावर एसीबीची कारवाई; आरोपीला रंगेहात अटक

अकोला - सौरऊर्जा पॅनलचे महावितरणसोबत करार करण्यासाठी चार हजार रुपयांची मागणी करणारा अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीनकुमार पवार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ता. २७ सप्टेंबर रोजी लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. लाचखोर अभियंता हा शहर उपविभाग तीन येथे कार्यरत आहे. तो मुळचा सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहे.

तक्रारदाराने ता. १५ सप्टेंबर रोजी अकोला एसीबीकडे तक्रार दिली होती. त्यानुसार तक्रारदार हा सोलर पॅनल बसवून देण्याचे काम करतो. सोलर पॅनर बसवून दिल्यानंतर संबंधित ग्राहक व महावितरण यांचेमध्ये नेट मिटरींगचे चार ॲग्रीमेंट करावे लागतात. त्यासाठी फाईलवर सह्या करण्यासाठी महावितरणच्या अकोला शहर उपविभाग तीन येथे नियुक्त अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीनकुमार पवारने प्रत्येक फाईलकरिता दोन हजार रुपयांची मागणी केली. एकूण आठ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तक्रारीवरून एसीबीने ता. २३ सप्टेंबरपर्यंत पडताळणी केली.

दरम्यान, तडजोड करून प्रत्येक फाईलसाठी प्रत्येकी एक हजार रुपयाप्रमाणे चार हजार रुपये स्वीकारण्याचे पवारने मान्य केले. ठरल्या प्रमाणे मंगळवार, ता. २७ सप्टेंबर रोजी दुपारी १.१० वाजताच्या सुमारास महावितरणच्या शहर उपविभाग तीन या कार्यालयात सापळा रचण्यात आला. पंचांसमक्ष पवारने चार हजार रुपये स्वीकारल्याने त्याला एसीबीने रंगेहात अटक केली असून, त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला जात आहे. लाचखोर अभियंता नितीनकुमार पवार हा मुळचा सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात असलेल्या लोणंद येथील हरवाशी असून, सध्या तो अकोला येथील तापडीया नगरात हनुमान मंदिराजवळ कोठारी यांच्या घरी भाड्याने राहतो. ही कारवाई अकोला एसीबीचे उपअधीक्षक यु.व्ही. नामवाडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.