Akola : स्टार्टअप’मुळे अकोल्याच्या अभियंता मित्रांची ‘उद्योग भरारी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola : स्टार्टअप’मुळे अकोल्याच्या अभियंता मित्रांची ‘उद्योग भरारी

Akola : स्टार्टअप’मुळे अकोल्याच्या अभियंता मित्रांची ‘उद्योग भरारी

अकोला : भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘स्टार्टअप’ अभियानामुळे नव कल्पनांसह पुढे येणाऱ्या उद्योजकांना बळ मिळत आहे. अकोल्यातील अक्षय दीपकराव कवळे आणि अक्षय रमेश वैराळे या दोघा अभियंता मित्रांच्या नवसंकल्पनांना आयआयटी कानपूर येथे स्टार्टअप २०२२ या स्पर्धेत देशातील उत्कृष्ट २९ संकल्पनांमध्ये निवडण्यात आले. जिल्हा नाविन्यता सोसायटी मार्फतही त्यांच्या संकल्पनांना बळ देण्यात आले असून, आता या दोघा मित्रांनी ‘उद्योग भरारी’ घेतली आहे.

अकोला शहरालगत शिवणी येथे अक्षय वैराळे आणि अक्षय कवळे या दोघाही बी.ई. मेकॅनिकल झालेल्या तरुण अभियंत्यांनी ‘ॲग्रोश्युअर’ या उद्योगाची सुरुवात केली. स्टार्टअप आणि जिल्हा नाविन्यता परिषद, यामुळे त्यांच्या नवसंकल्पनांना पाठबळ मिळाल्याने त्यांनी चांगलीच भरारी घेतली आहे. त्यांनी उभारलेल्या उद्योगातून शेतीसाठी लागणारी अवजारे तयार केली जातात. ही अवजारे ट्रॅक्टर व विडरच्या सहाय्याने चालणारी आहेत.

अल्पभूधारक शेतकरी ज्यांना महागडे अवजारे व मजूरांची मजूरी देणे परवडत नाही, अशा शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही अवजारे विकसित केली आहेत. आतापर्यंत त्यांनी अशी ३५ प्रकारची यंत्रे विकसित केली असून, गेल्या दोन वर्षात हे उद्योजक ८०० शेतकऱ्यांपर्यंत त्यांची उत्पादने पोहोचविण्यात यशस्वी झाले आहेत. त्यात कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातील शेतकऱ्यांचाही समावेश आहे.

जिल्हा नाविन्यता परिषदेकडूनही चालना

कौशल्य विकास विभागामार्फत स्थापित जिल्हा नाविन्यता परिषदेकडूनही त्यांच्या संकल्पनांना चालना देण्यात आली. त्यातूनही पाच लाख रुपयांचे अनुदान मिळाले. त्यातून त्यांनी कृषी विभागाला अवजारे बनवून दिली. ही अवजारे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात.