चक्क मुख्याध्यापकांच्या वेतनातूनच कापले विद्यार्थ्यांच्या बूट-मोजे, टाय-बेल्टचे पैसे

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 8 July 2020

विद्यार्थ्यांना वितरीत केलेल्या टाय, बेल्ट, बूट, मोजे यांच्या रक्कमेचे समायोजन न झाल्याने ती रक्कम मुख्याध्यापकांच्या वेतनातून कपात करण्यात आल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. सदर प्रकार नियमबाह्य असून, रक्कम परत करून संबंधितांवर कारवाई करावी; अन्यथा न्यायालयात जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शिक्षक समितीने प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात केली.

अकोला  ः विद्यार्थ्यांना वितरीत केलेल्या टाय, बेल्ट, बूट, मोजे यांच्या रक्कमेचे समायोजन न झाल्याने ती रक्कम मुख्याध्यापकांच्या वेतनातून कपात करण्यात आल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. सदर प्रकार नियमबाह्य असून, रक्कम परत करून संबंधितांवर कारवाई करावी; अन्यथा न्यायालयात जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शिक्षक समितीने प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात केली.

जिल्हा परिषदेने स्वउत्पन्नातून सन 2019-20 मध्ये विद्यार्थ्यांसाठी टाय, बेल्ट, बूट, मोजे वितरण करण्याची योजना राबविली होती. जिल्हा परिषद शाळांच्या सर्व मुख्याध्यापकांच्या खात्यावर निधी वर्ग करण्यात आला होता. या निधीतून मुख्याध्यापकांनी टाय, बेल्ट, शुज खरेदी करून विद्यार्थ्यांना वाटपसुद्धा केले. मात्र जि. प. प्रशासनाने मूळ पावत्या सादर करण्यासाठी मे 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली. या कालावधीत तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत मुख्याध्यापकांनी मूळ पावत्या पंचायत समिती स्तरावर सादर केल्या व समायोजन सुद्धा सादर केले. मात्र पंचायत समितीच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी या पावत्या वरिष्ठ कार्यालयात सादर न करता व स्वतः मुख्याध्यापकांनी कोणत्या प्रकारची खरेदी केले नाही असे शिक्षणाधिकारी यांना पत्र देऊन मोकळे झाले, असे शिक्षक संघटनाचे म्हणणे आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

याबाबत शिक्षक समितीकडून जि.प. पदाधिकारी-अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष विजय टोहरे, शिक्षक नेते गोपाल सुरे, जिल्हाध्यक्ष मारोती वरोकार, जिल्हा सरचिटणीस राजेश देशमुख यांच्यासह इतर शिक्षक उपस्थित होते.

4.15 लाखांची कपात
वेतन कपातप्रकरणी कोणत्याही पावत्या वरिष्ठ कार्यालयात सादर न झाल्यामुळे वेळोवेळी शिक्षणाधिकारी कार्यालयातून पत्रव्यवहार करण्यात आले. या सर्व बाबी पासून मुख्याध्यापक अनभिज्ञ होते. त्यामुळे प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापकांच्या वेतनातून चार लाख 15 हजार रुपयांची वसुली कोणत्याही प्रकारची चौकशी किंवा कारणे दाखवा नोटीस न देता करण्यात आली. या प्रकरणात मुख्याध्यापकांच्या वेतनातून कपात केल्यामुळे कोरोना संकटाच्या काळात उपजिविकेपासून वंचित ठेवण्याचा प्रकार घडला आहे, असे शिक्षक समितीचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Students' boot-socks, tie-belt money deducted from the principal's salary