
अकाेला : नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवरुन अनेक उपाययोजना सुरू आहेत. त्यानंतर सुद्धा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होण्यायेवजी सुरूच असल्याचे विदारक वास्तव आहे. जानेवारी ते मे २०२२ या पाच महिन्याच्या काळात सुद्धा जिल्ह्यातील ५१ शेतकऱ्यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केल्या. नापिकी, कर्जाचा वाढता बोजा व शेतमालाला भाव न मिळाल्याने येणारे सुलतानी संकट आदी कारणांच्या विवंचनेतून संबंधित शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले आहे. त्यापैकी एप्रिल शेवटपर्यंत केवळ बाराच आत्महत्या प्रकरणांना शासकीय मदतीला पात्र ठरविण्यात आले आहे, तर दोन शेतकऱ्यांना अपात्र ठरवून ३७ प्रकरण चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.
शेतीसाठी काढलेले कर्ज, उत्पादन दिसत असले तरी शेतमालाचे न परवडणारे दर, नापिकी व इतर कारणांमुळे त्रस्त झालेले शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे चित्र जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध कल्याणकारी याेजना शेतकरी आत्महत्या राेखण्यासाठी अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. आठवड्यात तीन-चार दिवसाआड सरासरी एक शेतकरी आत्महत्या हाेत असल्याचे सरकारी आकडे सांगत आहेत. २०१५ मध्ये शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा आकडा दाेनशेजवळ पाेहचला हाेता. त्यानंतरच्या वर्षांत सुद्धा जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दीडशेच्या खाली पाहायला मिळाले नाही. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस व शेतमालाचे चांगले उत्पादन हाेत आहे. परंतु त्यानंतर सुद्धा शेतकरी आत्महत्येच्या घटना सुरूच आहेत. शेतकरी आत्महत्याच्या घटना बघून शेती व शेतकऱ्यांची स्थिती गंभीर असल्याचे लक्षात येते.
सात दिवसात दोन आत्महत्या!
२०१५ मध्ये जिल्ह्यात एक दिवसाआड एक शेतकरी आत्महत्या हाेत हाेती. आता हे प्रमाण तीन चे चार दिवसाआड एक शेतकरी आत्महत्यावर येऊन पोचले आहे. जानेवारी ते मे २०२२ या पाच महिन्यात जिल्ह्यातील ५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध आहे. आत्महत्यांच्या या आकडेवारीमुळे सरकारकडून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांच्या दाव्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणांवर दृष्टीक्षेप
महिना पात्र अपात्र फेर-चौकशी एकूण
जानेवारी ०७ ०१ ०२ १०
फेब्रुवारी ०४ ०१ ०६ ११
मार्च ०१ ०० १३ १२
एप्रिल ०० ०० १२ १२
मे ०० ०० ०५ ०५
शेतकरी कल्याणकारी याेजनांपासून दूरच
शेतकरी आत्महत्या राेखण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी याेजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये प्रेरणा प्रकल्प, बळीराजा चेतना अभियान, अन्न सुरक्षा याेजना, महात्मा फुले जन आराेग्य याेजना, छत्रपति शिवाजी शेतकरी सन्मान योजना, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना तथा जिल्हा प्रशासनाच्या बंद पडलेल्या ‘दिलासा’ अभियानाव्यतिरीक्त इतरही याेजनांचा यात समावेश आहे, असे असल्यानंतर सुद्धा शेतकरी आत्महत्येच्या घटना कमी हाेत नसल्याचे दिसून येत आहे.