अकोला : ७१ हजार शेतकरी मदतीपासून वंचितच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला : ७१ हजार शेतकरी मदतीपासून वंचितच!

अकोला : ७१ हजार शेतकरी मदतीपासून वंचितच!

अकोला : जून ते जुलै व ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीबाधितांच्या बॅंक खात्यात दिवाळीपूर्वीच नुकसानीची रक्कम जमा करण्यात येईल, असे आश्वासन राज्य शासनामार्फत देण्यात आले होते. परंतु जिल्हा प्रशासनामार्फत दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली नाहीच, दूसरीकडे दिवाळीसंपल्यानंतर सुद्धा नुकसानग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामध्ये ७१ हजार ८७२ शेतकऱ्यांच्या समावेश असून आतापर्यंत १ लाख २९ हजार ५४५ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात शासकीय मदत जमा करण्यात आली आहे.

यावर्षी जिल्ह्यात पावसाला उशीराने सुरुवात झाली. परंतु त्यानंतर मात्र पावसाने रौद्र रूप दाखवले. २१ जुलै जुलैच्या रात्री ७ वाजतापासून जिल्ह्यात एकसारखा पाऊस कोसळला. पावसाचा जोर रात्री २ वाजेपर्यंत कायम राहिल्याने नदी-नाल्यांना पूर आला. अतिवृष्टीमुळे काही शेतात पाणी साचले तर काही भागातील शेतीच खरडून गेली. त्यासोबतच जिल्ह्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात सुद्धा अतिवृष्टी झाली. त्याचा फटका जिल्ह्यातील तीन ते चार तालुक्यांनाच बसला. त्यामुळे जून ते जुलै व ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यात झालेल्या पावसाचे प्रशासनामार्फत प्रत्येक ग्राम स्तरावर ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यकामार्फत संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार अतिवृष्टीमुळे जुलै महिन्यात जिल्ह्यातील १ लाख ३१ हजार ४९४.९४ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांचे ११५ कोटी ३५ लाख ३४ हजार २१६ रुपयांचे नुकसान झाले. त्यापैकी ९ हजार ३८ हेक्टरवरील शेतजमिन खरडून गेल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना शासनाने मदत निधी उपलब्ध करुन दिला होता. याव्यतिरिक्त ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यात सुद्धा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सुमारे चार हजार हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले. त्याचा फटका ४ हजार ७२५ शेतकऱ्यांना बसला होता. दरम्यान संबंधित शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करुन दिल्यानंतर दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येईल, असे आश्वासन राज्य शासनाने दिले होते. परंतु दिवाळीनंतर सुद्धा शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळत नसल्याने प्रशासनाच्या उदासीनतेचा फटका शेतकऱ्यांना बसल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: संसदेपर्यंत ट्रॅक्टर मार्च निघणारच; अजून मागण्या बाकी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं

वाढीव मदतीची प्रतीक्षा

जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीने शेती पिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या प्रचलित दरानुसार यापूर्वीच मदत जाहीर केली होती. परंतु गत महिन्यात शासन निर्णय यासंबंधीचा शासन निर्णय काढण्यात आला. सदर वाढीव निधी जिल्ह्यातील सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात आला आहे. परंतु जून ते जुलै महिन्यात नुकसान झालेल्या बाधितांसाठी अद्याप मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांना वाढीव मदतीची सुद्धा प्रतीक्षा आहे.

अशी आहे मदत वाटपाची स्थिती

  • जून ते जुलै महिन्यात जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ४३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यापैकी आतापर्यंत १ लाख १९ हजार ६९२ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात मदत जमा करण्यात आली आहे, तर ६ हजार ३५१ शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. तर मदत वाटपाची टक्केवारी ७३ आहे.

  • सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील ४ हजार ७२५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यापैकी ३ हजार ४६ शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे, तर १ हजार ६७९ शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. मदत वाटपाची टक्केवारी ७१.१० आहे.

  • जून ते जुलै महिन्या जिल्ह्यातील १ लाख ६ हजार ६४९ शेतकऱ्यांची शेत जमिन खरडून गेली होती. त्यापैकी ६ हजार ८०७ शेतकऱ्यांना आतापर्यंत मदत मिळाली आहे, तर ९ हजार ८४२ शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. मदत वाटपाची टक्केवारी २४.७७ आहे.

loading image
go to top