
अकाेला : विनाअनुदानित शिक्षक शिक्षकेतरांचा एल्गार
वाशीम : राज्यातील विना अनुदानित तथा अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक शिक्षकेतरांना १०० टक्के वेतन मिळावे या मागणीसह अन्य मागण्यांकरीता महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक, क. म. वि. शाळा कृती समिती संघटनेच्या वतीने राज्यभर एल्गार पुकारण्यात आला असून त्याची सुरुवात वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन करण्यात आली.
शिक्षक शिक्षकेतर समन्वय संघाच्या वतीने राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, घोषित, अघोषित शाळा व नैसर्गिक वाढीच्या तुकड्यावर हजारो शिक्षक शिक्षकेतर कित्येक वर्षांपासून विनावेतन, अल्पवेतनावर ज्ञानदानाचे काम करीत आहेत. त्यांना न्याय मिळावा यासाठी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने १ मेपासून जालना येथील स्मशानात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. तथापि अद्याप शासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राज्यातील ३६ जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतरांनी एकसाथ एल्गार पुकारीत एक दिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात, अघोषित, त्रुटी पात्र व अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दि. १५ नोव्हेंबर २०११ तसेच २४ जून २०१४ च्या शासन निर्णयानुसार वेतन अनुदान वितरणाचे सुत्र लागु करुन पुर्ण १०० टक्के वेतन अनुदानासह १०० टक्के पगार सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच यासंदर्भातील शासन निर्णय दि.२२ मे २०२२ पर्यंत निघावा अन्यथा दि. २३ मे २०२२ पासुन आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्रातील विना तथा अंशत: अनुदानित हजारो शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बेमुदत धरणे आंदोलन व बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
या आंदोलनात महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक क.म.वि. शाळा कृती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत कवर, संघटक प्रा. दिगंबर गुडदे, सचिव प्रा. सुनील अवगन, उपाध्यक्ष प्रा. पंडितराव देशमुख, तालुकाध्यक्ष प्रा. किशोर कोल्हे, प्रा. संतोष वाझुळकर, प्रा. संदीप कुटे, प्रा. बारड, प्रा. साजीद, प्रा. संतोष जाधव, प्रसिद्धी प्रमुख प्रा. गजानन इळे, संघटक प्रा. किशोर शिंदे, विठ्ठल वाघ यांच्या नेतृत्वाखाली मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. विनोद नरवाडे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष राजकुमार बोनकिले, पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांत उपाध्यक्ष विनायक उज्जैनकर, शिक्षक संघर्ष संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. विजय भड, अमरावती विभाग शिक्षक संघाचे प्रा. अरुण सरनाईक, जयंत सरनाईक, शिक्षकेतर संघाचे कैलास ढवळे यांच्या सह शेकडो शिक्षक शिक्षकेतर उपस्थित होते.
शिक्षक शिक्षकेत्तरांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध! - आ. किरण सरनाईक
या आंदोलनाला अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, मी अपक्ष असताना विभागातील शिक्षकांनी मला विश्वासाने निवडून दिले. सध्या शिक्षण क्षेत्रात अनेक समस्या असून त्या सोडविण्यासाठी मी कटीबद्ध आहे.अनुदानाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सोबत लवकरच बैठक लावण्याचे आश्वासन आ. सरनाईक यांनी यावेळी दिले.
Web Title: Akola Agitation Of Un Granted Teachers Maharashtra State Higher Secondary School
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..